

Varandha Ghat ST bus no entry
महाड : मागील तीन वर्षांपासून वरंधा घाटातून नियमित एसटी सेवा सुरू करण्याच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे याच मार्गावरून गेल्या आठ दिवसांपासून पर्यटकांच्या सहलीच्या एसटी बसेस आणि अवजड मालवाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
महाड-पुणे जोडणाऱ्या या घाटात भोरच्या हद्दीत रस्ता नादुरुस्त असल्याचे कारण देत एसटी प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. मात्र, कोकणात येणाऱ्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागातील शाळांच्या सहलींच्या बस याच मार्गाने जात आहेत. "जर सहलीच्या बसेस जाऊ शकतात, तर नियमित प्रवासी बस का नाही?" असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत ही सेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आदेश असूनही स्थानिक प्रशासन आणि एसटी यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
घाटात सद्यस्थितीत कुठेही दुरुस्तीचे काम सुरू नसतानाही केवळ अडवणूक केली जात असल्याचा आरोप पारमाचीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल मालुसरे यांनी केला आहे. ग्रामस्थांची ही गैरसोय थांबवून तातडीने प्रवासी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.