

Mahad Gondale Gaulwadi School Tree Collapse
महाड : महाड तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील राजीव गांधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंडाळे गौळवाडीच्या आवारातील मोठे चिंचेचे झाड आज मुळासकट उन्मळून पडल्याने शाळेच्या किचन शेडचे मोठे नुकसान झाले. तसेच संरक्षण भिंतीचा सुमारे १० ते १५ फूट भाग कोसळला.
सुदैवाने चिंचेचे झाड शाळेच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असल्याने इमारतीचे कोणतेही नुकसान झाले नाही. आज मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करण्याचे काम सुरू असून, शाळेच्या शिक्षिका स्नेहल प्रसाद नगरकर आणि आश्विनी अंकुश बोडरे या घटनास्थळी उपस्थित होत्या, अशी माहिती मिळाली आहे.