

Mahad Atrocity Act FIR
महाड : महाड तालुक्यातील शिरगावचे सरपंच तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांच्यासह अन्य दोघांवर जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहन किसन ढेंडवाल (वय ३८, रा. काकरतळे, महाड, जि. रायगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे काही मित्र महाड बेकरी परिसरात गप्पा मारत उभे असताना सोमनाथ ओझर्डे तेथे आले. त्यांनी फिर्यादीकडे उद्देशून, “बघितलेस ना कशी जिरवली, तुझ्या विकास गोगावलेची, होतो का जामीन आता बघ!” असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्यावर फिर्यादीने शब्द जपून वापरण्याची विनंती केली असता, फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याच्या कारणावरून ओझर्डेंसह अन्य दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ दिगंबर ओझर्डे (रा. शिरगाव, महाड), अक्षय भोसले (रा. नवे नगर, महाड) व प्रतीक जगताप (रा. ताम्हाणे, महाड) यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहे.