काम थांबवा, अन्यथा जीव देऊ; खैरे ग्रामस्थ- फार्मा कंपनी व्यवस्थापनात संघर्ष

Raigad Mahad News | महाड एमआयडीसीतील काम ग्रामस्थांनी रोखले
Khaire villagers protest
महाड एमआयडीसीतील फार्मा कंपनीचे काम खैरे ग्रामस्थांनी रोखले. Pudhari Photo
Published on
Updated on
श्रीकृष्ण द बाळ

महाड : मागील सहा महिन्यांपूर्वी खैरे ग्रामस्थांच्या तीव्र संघर्षानंतर बंद केलेली महाड औद्योगिक वसाहतीमधील सुदर्शन फार्मा कंपनीच्या कामाला कंपनी व्यवस्थापनाने आज (दि.३) पुन्हा सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काम रोखले. कोणत्याही परिस्थितीमध्ये या कंपनीच्या कामाला परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही प्राण देऊ, असा इशारा कंपनी व्यवस्थापनाला ग्रामस्थांनी दिला. (Raigad Mahad News)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाड एमआयडीसीत (MIDC) सुदर्शन फार्मा या कंपनीचे बांधकाम खैरे गावाच्या हद्दीत सुरु आहे. या कामाला ग्रामस्थांचा विरोध आहे. पावसाळ्यापूर्वी या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तीव्र आंदोलन व हरकतीनंतर पोलीस प्रशासनाने काम थांबवण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाला दिल्या होत्या. त्यानुसार गेले सहा महिने हे काम बंद होते. दरम्यान, आज सकाळी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने कामाला सुरूवात करण्यात आली. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने कामाला हरकत घेतली. कंपनीच्या गाड्या आणि जेसीबी रोखून धरण्यात आले.

यासंदर्भात गाव कमिटीचे अध्यक्ष यशवंत सावंत यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी या कंपनीने कामास प्रारंभ केला होता. तेव्हा ग्रामस्थांनी कंपनीला विरोध केला असून या कंपनीबरोबरच अन्य एका कंपनीच्या कामालाही विरोध केला आहे. मात्र, सहा महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर संबंधित कंपनीने आपले कामकाज बंद केले आहे असे निदर्शनास आणले. आज कोणतीही पूर्व सूचना न देता कंपनीकडून पुन्हा एकदा कामास सुरूवात केली आहे. त्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. पावसाळ्यामध्ये या कंपनीच्या कामामुळे दरड कोसळण्याची घटना घडली होती. मात्र, मोठी दुर्घटना टळली होती.

महिला संघटनेच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनीही वेळप्रसंगी प्राण देऊ, पण या कंपनीच्या कामाला आम्ही परवानगी देणार नाही. गावाशेजारील अन्य कंपन्यांमुळे अनेक महिलांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे आगामी काळात अशा पद्धतीच्या कंपन्या परिसरामध्ये येऊ नयेत, यासाठी सर्व महिला गावातील युवकांसमवेत संपूर्ण ताकदीनिशी उभ्या राहणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत म्हणाले की, फार्मा कंपनीच्या कामाला नागरिकांनी विरोध केला होता. या संदर्भात वारंवार विनंती करूनही शासनाने पुन्हा एकदा कंपनी प्रशासनाला काम करण्याची परवानगी दिली आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून कोणत्या अधिकाराखाली परवानगी दिली आहे, हे शासनाने सांगावे.

दरम्यान, यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Khaire villagers protest
रायगड : महाड नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात दिव्यांग संतप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news