Raigad Leptospirosis News | रायगडमधील पाच तालुक्यांत लेप्टोचे १७ रुग्ण
रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये नव्या वर्षातच लेप्टोचा धोका निर्माण झाला आहे. अलिबागसह पाच तालुक्यात लेप्टो बाधीत १७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यामध्ये बर्डफ्लू बरोबरच आता लेप्टो आज-ाराने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. दूषित पाण्यामध्ये बराच वेळ चालल्यामुळे तसेच प्राण्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून होणाऱ्या या आजारावर योग्य वेळी उपचार न घेतल्यानेही लेप्टोचा धोका असतो. उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यांच्या वाढीवर निर्बंध न राहिल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचे प्रमाण वाढल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लेप्टोचे रुग्ण सापडू लागले आहेत. १ ते १८ जानेवारी या कालावधीत १७ जणांना लेप्टोची बाधा झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून उपलब्ध झाली आहे. हे रुग्णांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी नऊ जणांची प्रकृती चांगल्या असल्याने त्यांना उपचार करून सोडण्यात आले आहे. एका रुग्णाला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण कक्षात झालेल्या तपासणीमध्ये सहा रुग्ण लेप्टोस्पायरोसिस संशयीत असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेण, माणगाव, रोहा, मुरूड या तालुक्यातील रुग्ण सापडले आहेत. त्यात अलिबागमधील सात, पेण, मुरूडमधील प्रत्येकी दोन, रोहा, माणगावमधील एक लेप्टोसायरोसिस रुग्ण असल्याची माहिती उपलब्ध झाली आहेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

