

वढाव : पेण तालुक्यात वाशी विभाग व शिर्की विभाग खारेपाटांत पाईप लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशीनाका ते वाशी येथील मध्यावर पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.
खारेपाटांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून गेली अनेक वर्ष या परिसरांतील नागरीकांनी पत्रव्यवहार, बैठका, अनेक आंदोलने करुन पेण खारेपाटांतील पिण्याच्या पाण्याचा हा गंभीर प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला.
38 कोटींचा निधी मंजूर होऊनही सदर काम 7 वर्ष चालु असून प्रशासनाकडून मात्र काम 2 वर्षापूर्वी 98 टक्के पूर्ण झाले आहे. मग 2 टक्के काम पूर्ण होण्यासाठी एवढा उशीर का? हे एक कोडच आहे. आत्ता तर झालेले काम इतके नित्कृष्ठ दर्जाचे आहे की या नवीन पाईप लाईनला पाणी सोडले की पाईप लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशीनाका ते वाशी येथील मध्यावर पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. नवीन पाईप लाईन फुटण्याला जबाबदार कोण, ठेकेदार, प्रशासन की लोकप्रतिनिधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सदर नविन पाईप लाईन चे काम इतके नित्कृष्ठ दर्जाचे आहे की ही पाईप लाईन जमिन खाली एक मीटर खोदुन टाकायची होती तसेच प्रत्येक जॉइर्ंडवर सिमेंटचे ब्लॉक टाकायचे होते तसे झालेले दिसत नाही. यामुळे सदर पाईप लाईन फुटीचे सत्र सुरु आहे. वेळीच कामावर इंजिनीअर व लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले असते तर कामासाठी आलेले जनतेचा 38 कोटीचा निधी वाया गेला नसता.
2 वर्षापुर्व वेळेवर काम पुुर्ण केलेे नााही म्हणून सदर ठेकेदारा कडुन ठेका काढून घेतला. परंतु नवीन ठेकेदार नेमण्यास दिरंगाई झाल्यामुळे नवीन लाईनचे उर्वरीत काम पूर्ण होईल यात शंका निर्माण झाली होती. यावर्षी सुद्धा पेण खारेपाट भागाला पाणी वेळेेेवर मिळणार नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लाागणार आहे. या कामापैकी वाशीनाका ते वाशी ही जुनी पाईप लाईन अत्यंत नादुरुस्त व जिर्ण झाली आहे.
जर का वढावपर्यंत चांगल्या प्रकारे काम पुर्ण झाले असते तर वाशी खारेपाट भागातील ग्रामस्थांना जलवाहिनी फुटीचेे सत्र थांबुन पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागली नसती. नेहमीच जलवाहिनी फुटीच्या सत्राला कंटाळुन ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. तसेच या संदर्भात खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात अंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
सदर नवीन पाईप लाईनचे काम इस्टीमेटप्रमाणे झाले नाही. एवढी टेक्नॉलॉजी असताना पाईप लाईन का फुटते? याचा अर्थ ठेकेदार अनुभवी नाही तसेच अधिकारी वर्गाला ठेकेदाराकडून काम करुन घेता येत नाही. येथील जमीन खारी असल्याने प्रत्येक जॉईन्टवर सिमेंटचे ब्लॉक असणे आवश्यक होते ते कुठे दिसत नाही. म्हणून असे प्रकार वारंवार घडत आहेत.
सी. आर. म्हात्रे, सचिव, खारेपाट विकास संकल्प संघटना
नवीन पाईप लाईनला लिकेज झाले आहे, तरी लवकरात लवकर लिकेजचे काम करून खारेपाट विभागाला सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जाईल.
मुनाफ शेख, अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण