

Raigad crime news
खोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी ७ वाजता निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला.
ही घटना आज सकाळी सात वाजता खोपोलीतील साईबाबा नगर परिसरात घडली,. मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी एका अज्ञात वाहनातून चार ते पाचजण उतरले. त्यांनी मंगेश यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी घातली आणि त्यांच्यावर तलवारी व चॉपरने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता. काळोखे आणि देवकर या दोन कुटुंबांत आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या १५-२० वर्षांपासून वाद सुरू असल्याचे समजते. निकालादिवशी देखील त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
काळोखे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मंगेश यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि एक संशयास्पद गाडी परिसरात फिरत होती. याबद्दल पोलिसांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.