

अलिबाग : ग्रामीण विकासाच्या दिशेने नियोजनबद्ध वाटचाल करत रायगड जिल्ह्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अभियानात खालापूर पंचायत समितीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे खालापूर पंचायत समितीचा गौरव करण्यात आला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार, ग्रामविकासाचे नियोजन आणि लोकसहभाग यांच्या बळावर हे यश मिळाले आहे.
नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड, तसेच चौक व वडवळ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात रायगड जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये खालापूर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश होता. ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन, अभियानाच्या निकषांनुसार विविध विकासकामांची अंमलबजावणी आणि नागरिकांचा सहभाग यामुळे खालापूर पंचायत समितीला राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार मिळवता आला.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी खालापूर पंचायत समितीसह अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले. आगामी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी नव्या जोमाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनीही या यशाबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व घटकांचे कौतुक केले. आगामी अभियानात जलसंधारण, स्वच्छता आणि लोकसहभागावर अधिक भर देऊन कामगिरी उंचावण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात रायगड जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळवता आला नसल्याची खंत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी व्यक्त केली. मात्र, आगामी अभियानात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर समन्वय वाढवून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. खालापूर पंचायत समितीच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणेला प्रोत्साहन मिळाले आहे. आगामी अभियानात जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेऊन विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.