

अलिबाग: गॅस सिलेंडर च्या वाढत्या किंमतीमुळे ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलीकडे वळली आहे. सद्यस्थितीत आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यासह जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या तुटवड्या होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
यावर उपाय म्हणून शासनाने रेशनद्वारे रॉकेल वितरणाचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत रायगड जिल्ह्यासाठी १२० किलो लिटर रॉकेल मंजूर झाले असून, प्रतिरेशनकार्डनुसार (प्रतिकुटुंब) तीन लिटर याप्रमाणे त्याचे वाटप सुरू झाले असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना वितरणात प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारकांनाही याचा लाभ मिळेल. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला सादर केल्यानंतर रॉकेल मिळू शकणार आहे, तसेच स्थलांतरित मजुरांना ओळखपत्राच्या आधारे लाभ दिला जाईल.
शासकीय नियमानुसार रॉकेल मंजूर झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत लाभार्थ्यांनी आपला साठा उचलणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत न उचललेला साठा पुढील महिन्यात दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेत आपला कोटा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वितरणात पारदर्शकता राहावी, यासाठी रास्त भाव दुकानदार आणि परवानाधारकांना भौतिक नोंदवहीत अचूक नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१० हजार लिटरचे ४ टॅंकर दाखल
रायगड जिल्ह्यातील ५ लाख ५० हजार रेशनकार्ड धारकांसाठी १ लाख २० हजार लिटरचे रॉकेलचे नियत्वय मंजूर झालेले आहे. यातील १० हजार लिटरचे ४ टॅंकर जिल्ह्यात पोच झाले असून त्याचे वितरण सुरु आहे. यामुळे गॅस टंचाईची झळ पोहचलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
भेसळीपासून सावध राहा
रॉकेलचा वापर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळीसाठी होण्याची शक्यता असते. हे रोखण्यासाठी जिल्ह्य प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. अनधिकृत विक्री, काळाबाजार किंवा साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गॅसटंचाईच्या काळात प्रामीण भागातील दुर्बल घटकांना इंधनासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी ही यंत्रणा सज्ज केली आहे.
रॉकेल वितरणाची जुनी व्यवस्था सध्या वापरात राहिलेली नाही, परंतु जे जुने परवानाधारक वितरक होते त्यांच्या माध्यमातून हे वितरण सुरु आहे. सध्यातरी प्रति रेशनकार्डसाठी ३ लिटर रॉकेल दिला जात आहे. पुढील रॉकेल केव्हा मिळेल, याचे निर्देश शासनाकडून अद्यापतरी आलेले नाहीत.
- डॉ. रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी