

रायगड ः किशोर सुद
रायगडकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी जल जीवन मिशनमार्फत 1 हजार 496 योजना मंजूर झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 912 योजना पर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र शासनाने गेल्या वर्षभरापासून जलजीवनसाठी निधीच दिलेला नाही. जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे 100 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा आवश्यक निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जलजीवनच्या योजनांच्या कामांवर परिणाम होत आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र नियोजना अभावी हे पाणी समुद्रात वाहून जाते. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील नद्या, ओढे कोरडे पडू लगतात. आणि उन्हाळ्यात अनेक गावात भीषण टंचाई उद्भवते. पावसाळ्यात पाणीदार असलेली गावे उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करतांना दिसतात. यावर्षी जिल्ह्यातील 40 गावे आणि 238 वाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती.
जवळपास 1 लाख 11 हजार 231 लोकसंख्येला पाणी टंचाईची झळ बसली. त्यामुळे चाळीस टँकरव्दारे या गावे आणि वाड्यांना पाणी पुरवठा करावा लागला. असे असले तरी गेल्या वर्षीच्या यावर्षी टंचाईग्रस्त गावाच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिस येत आहे. गेल्या वर्षी 92 गावे आणि 301 वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य पहायला मिळाले होते. 1 लाख 21 हजारहून अधिक लोकसंख्येला या टंचाईची झळ बसली होती. त्यामुळे 58 टँकर व्दा पाणी पुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 120 गावे आणि वाड्या यंदा टंचाई मुक्त झाल्या आहेत. जलजीवन योजनांमुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या लक्षणीय घटली आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत असे अधिकार्यांकडून सांगितले जाते.
रायगड जिलह्यात अलिबाग तालुक्यात जलजीवन मिशनच्या 127 योजना मंजूर असून 65 योजना पूर्ण झाल्या आहेत. कर्जतमध्ये 123 योजना मंजूर असून 69 पूर्ण झाल्या आहेत. खालापुरात 92 योजना मंजूर असून 47 पूर्ण झाल्या आहेत. महाडमध्ये 159 योजना मंजूर असून 68 पूर्ण झाल्या आहेत. माणगावमध्ये 153 योजना मंजूर असून 107 पूर्ण झाल्या आहेत. म्हसळामध्ये 60 योजना मंजूर असून 45 पूर्ण झाल्या आहेत. मुरुडमध्ये 60 योजना मंजूर असून 39 पूर्ण झाल्या आहेत. पनवेलमध्ये 133 योजना मंजूर असून 69 पूर्ण झाल्या आहेत.
पेणमध्ये 113 योजना मंजूर असून 66 पूर्ण झाल्या आहेत. पोलादपूरमध्ये 93 योजना मंजूर असून 56 पूर्ण झाल्या आहेत. रोहामध्ये 144 योजना मंजूर असून 105 पूर्ण झाल्या आहेत. श्रीवर्धनमध्ये 66 योजना मंजूर असून 52 पूर्ण झाल्या आहेत. सुधागडमध्ये 93 योजना मंजूर असून 67 पूर्ण झाल्या आहेत. तळामध्ये 58 योजना मंजूर असून 39 पूर्ण झाल्या आहेत. उरणमध्ये 22 योजना मंजूर असून 7 पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
579 योजना ग्रामपंचायतींकडे वर्ग
रायगडमधील 912 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. या योजनामधून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यातील 579 योजना संबंधित ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यात अलिबाग तालुक्यातील 46, कर्जत 50, खालापूर 47, महाड 44, माणगाव 81, म्हसळा 32, मुरुड 19, पनवेल 27, पेण 38, पोलादपूर 39, रोहा 76, श्रीवर्धन 37, सुधागड 28, तळा 36 आणि उरण 5 योजनांचा समावेश आहे. या योजनांचा शंभर टक्के निधी वितरित करण्यात आला आहे.
योजनांच्या कामांवर परिणाम
रायगड जिल्हयासाठी 1 हजार 496 मंजूर योजनांपैकी 912 योजना पूर्ण झाल्या आहेत. 912 पैकी 579 योजना संबंधित ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. मात्र उर्वरित योजनांपुढे निधीची अडचण आहे. गेल्या वर्षभरापासून जलजीवन मिशन योजनेसाठी शासनाने निधीच दिलेला नाही. रायगड जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे या योजनांसाठी 100 कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र हा निधी जिल्हयाला मिळालेला नाही. त्यामुळे चालू योजनांच्या कामांवर परिणाम होत आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वैयक्तीक नळ पाणी पुरवठ्याच्या 96 योजना मंजूर आहेत. त्यातील 49 योजना पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या 49 योजनांपैकी अलिबाग तालुक्यात 3, कर्जत, मुरुडमध्ये प्रत्येकी 1, माणगाव, रोहा आणि सुधागड प्रत्येकी 2 आणि पेण तालुक्यात 6 अशा 17 योजना आर्थिक दृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत.