

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान सुरू झालेला शाब्दिक संघर्ष आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत टोकापर्यंत पोहोचण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.
मागील अडीच वर्षापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेने आपली जोरदार हरकत नोंदविली होती त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या असणाऱ्या शासन काळात देखील या संदर्भातील नाराजी शिवसेनेच्या आमदाराकडून करण्यात आली होती.
सध्या मुख्यमंत्र्यांकडून रायगड व नाशिक येथील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असती तरीही या पक्षात होणाऱ्या निर्णयाचे दूरगामी परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसून येण्याचे संकेत कार्यकर्त्यांच्या अनौपचारिक झालेल्या चर्चेमधून दिसून येत आहेत.
महाड-पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिक अत्यंत आक्रमक पद्धतीने या संदर्भात आपली भूमिका मांडत असून आगामी काळात राष्ट्रवादीशी कोणतीही तडजोड शिवसेना पक्ष नेतृत्वाकडून करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दरम्यान केली जाण्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सुमारे दोन दशकांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी व शिव सेना तसेच काँग्रेसदरम्यान झालेल्या संघर्षात नगरपालिका निवडणुकीमध्ये महाडमध्ये क्रमांक दोनची मते राष्ट्रवादी पक्षाने प्राप्त केली होती.
मागील दोन दशकांपासून महानगर परिषदेवर जगताप कुटुंबीयांची निर्विवाद सत्ता असून त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून यावेळेला प्रखर संघर्ष केला जाईल असे स्पष्ट संकेत मिळत असतानाच महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षांतर्गत शिवसेनेच्या झालेल्या सध्याच्या संघर्षात्मक स्थिती लक्षात घेता आगामी काळात जगताप कुटुंबीयांच्या विरोधात महाडमध्ये महायुतीमध्ये दोन तट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे याचा लाभ कोणाला होणार अशी विचारणा सर्व पक्षातील कार्यकर्त्यांकडून केली जात असून सद्यस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या महायुती मधील अंतर्गत संघर्षाचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल असे मानले जात आहे.
मागील तीन साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून यादरम्यान लोकसभा विधानसभेच्या निवडणुका मात्र नियमित वेळेनुसार पार पडल्या आहेत.
राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात देखील आगामी काही काळात मोठे राजकीय बदल होण्याची संकेत प्राप्त झाले आहेत हे लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पालकमंत्री पदावरून अधिक संघर्षात्मक स्थितीकडे जाईल अशी शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हयामधील शेतकरी कामगार पक्षाची भूमिका या सर्व संदर्भात महत्त्वपूर्ण ठरणार असून आगामी काही काळात या पक्षातून बाहेर पडलेल्या मान्यवरांची कोणती भूमिका राहते याकडे जिल्ह्यातील सर्व पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकेकाळी जिल्ह्याची सर्वंकश सत्ता शेतकरी कामगार पक्षाकडे होती मात्र सद्यस्थितीमध्ये हा पक्ष अत्यंत संघर्षाच्या स्थितीपर्यंत पोहोचला असून भविष्यात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या पक्षाकडून कशा पद्धतीची रणनीती आखली जाते हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष व शेतकरी कामगार पक्ष या दोन पक्षांची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायती पातळीपासून जिल्हा परिषदेपर्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. महायुतीमधील अंतर्गत संघर्षानंतरही या दोन पक्षांची ताकद दोन्ही बाजूला निर्णायक आघाडी देण्यासाठी महत्त्वाची ठरेल अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. एकूणच रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू झालेला संघर्ष किती दिवसांमध्ये थांबतो व त्या पश्चात दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय निरीक्षकांसह रायगड जिल्ह्यातील सुज्ञ जनतेचे लक्ष लागून राहिले आहे