

अलिबाग : ‘एक दोन तिन चार... गणपतीचा जयजयकार...,’ ‘गणपती बाप्पा मोरया या... पुढच्या वर्षी लवकर या...’ अशा जयघोषासह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी दहा दिवसांच्या गणपती बाप्पाचे शनिवारी विसर्जन झाले. अनेकांच्या घरी परंपरेनुसार दहा दिवसांचे बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दुपारी साडेचार नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. सायंकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्याने अनेक ठिकाणी भाविकांनी विसर्जन मिरवणुका आटोपत्या घेतल्या.
अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेशोत्सवाची सांगता शनिवारी मोठ्या उत्साहात झाली. रायगड पोलीस क्षेत्राच्या हद्दितील सार्वजनिक 169 आणि खाजगी 18 हजार 42 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून पुढे पाच दिवस मुसळधार पावसामुळे गणेशोत्सवाचे वातावरण थंडावले होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरु झालेली गणेशोत्सवाची धूम रविवारी थांबली. शनिवारी सगळीकडे शांततेत गणेशमूर्तींचे विसर्जन करुन गणरायाला निरोप दिला गेला.
अनंत चतुर्दशीच्या गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था यांनी तयारी केली होती. पोलीस विभागाने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त पार पाडला. तर आवश्यक ठिकाणची वाहतूक बंद करून विसर्जन मिरवणुकीचा मार्ग मोकळा केला होता. विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणार्या डी.जे. साऊंड सिस्टिमवर कारवाई करण्यासाठी काही पोलीस ठाण्यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली गेली होती. तसेच ग्रामीण भागात पोलीस पाटलांनाही ध्वनी प्रदूषणांच्या तक्रारीकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.
पर्यावरणाचे रक्षण
शासनाने यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला होता. शाडूच्या मातीच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीच्या मूर्तींची संख्या वाढली होती. या शिवाय पूजेचे निर्माल्य संकलीत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या प्रमाणे यावर्षी विविध सामाजिक संस्थांनी निर्माल्य संकलनात पुढाकार घेतलेला दिसून आला.
उत्सवांमध्ये डिजे साऊंड व इतर वाद्य वाजवली जातात. यात अनेक वेळेला शासनाने घालून दिलेल्या कमाल आवाजाच्या निर्बंधाचे उल्लंघन होताना दिसते. याही गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकांमध्ये कानठळ्या बसविणार्या आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार्या डिजे साऊंड सिस्टीमचा आवाज वाढलेला दिसून आला. त्यामुळे आरोग्याला हानिकारक अशा डिजे साऊंड सिस्टीमविरोधात आणखी जनजागृतीची आवश्यता आहे.
या वर्षी पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. गणेशोत्सवाच्या दोन-तीन दिवस आधीपासून पावसाच्या जोरदार सुरू आहेत. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवावर पावसाचे सावट होते. गेल्या दहा-बारा दिवसात अधून-मधून पावसाच्या सरी होत्या. शनिवारी गणेश चतुर्दशीच्या गणेश विसर्जनावेळी जिल्हयात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची तारांबळ उडालेली दिसून आली. त्यामुळे विसर्जन मिरवणुका आटोपत्या घेण्यात आल्या.