अलिबाग ः रायगडात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.पाच दिवसांच्या गौरी,गणपतीचे गुरुवारी यथासांग विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले. अजून पाच दिवस सार्वजनिक गणेशोत्सव जोरात सुरु राहणार आहे.या गणेशोत्सवामुळे रायगडच्या अर्थचक्राला चांगली गती मिळाल्याचे दिसून आले.समाजातील सर्वच घटकांना बाप्पामुळे हाताला काम आणि कष्टाचे दाम मिळाल्याने सर्वच घटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडीचा आणि भक्तीभावाने साजरा होणार सण आहे.त्यामुळे या सणाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते.रायगडही त्याला अपवाद ठरलेला नाही.विशेष म्हणजे यावेळी वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावली.जिल्ह्यातील सर्व धरणेही तुडूंब भरलेली आहेत.शिवारात भाताची पिके जोमाने वाढत आहेत.त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.यामुळे तो सुद्धा गणेशोत्सवात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले.
गणपतींच्या मूर्तींचे माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणपती मूर्ती कारखान्यांमधून यावेळीही मोठी उलाढाल झाली.25 ते 30 लाख मूर्तींची निर्मिती होऊन त्या सर्व मूर्तींची संपूर्ण राज्यासह देशात,विदेशातही विक्री झाली. विशेष म्हणजे यावेळी महिला बचत गटानीही मूर्ती निर्मिती आणि खरेदी,विक्रीत सहभाग नोंदविला.किरकोळ दुकानदारांनाही या गणेशोत्सवात हाताला काम मिळाले.महिलांनीही तयार पदार्थांची निर्मिती करीत कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.
गणेशोत्सवामुळे रायगडच्या सर्वच बाजारपेठांमध्ये कमालीचे चैतन्य जाणवत आहे.गेले महिनाभर विविध वस्तुंच्या खरेदी,विक्रीची उलाढाल झाली आहे.पुढील पाच दिवसही ही उलाढाल अशीच सुरु राहणार आहे.या खरेदी विक्रीमुळे घरोघरी विविध प्रकारच्या वस्तुंची खरेदीही झाल्याचे दिसून आले. फळे,फुले विक्रेते, पुरोहित, ब्राह्मण, सुपांची निर्मिती करणारे,रानभाज्या विकणारे या सर्व सामान्य घटकांवरही बाप्पाची कृपा झाली.सर्वांनाच गणेशाने आर्थिक बळ दिले.परिणामी रायगडचे आर्थिक चक्रच गतिमान झाल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवानंतर राज्य विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.त्यामुळे यावेळचा गणेशोत्सव सर्वच राजकीय पक्षांसाठी पर्वणी ठरला आहे.श्रावणात साजरा झालेला दहीहंडीचा सण सर्वच राजकीय पक्षांनी कॅच केल्याचे दिसून आले.त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोहोरा गणेशोत्सवाकडे वळविला.जे इच्छूक उमेदवार आहेत त्यांनी अनेक सार्वजनिक मंडळांवर देणग्यांची खैरात करत मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपलेसे केल्याचे दिसून आले.अनेक मंडळांच्या परिसरात देणग्या देणार्या इच्छुकांचे भावी उमेदवार,भावी आमदार असे उल्लेख केलेले बॅनर्स लागल्याचे ठळकपणे दिसून आले.आता सर्वांचा लाडका बाप्पा कुणाला प्रसन्न होतो हे निवडणूक निकालानंतरच दिसून येणार आहे.