रायगड : मोरया बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सुरेल वाद्यांच्या तालावर रायगडात गुरुवारील गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.या निमित्ताने गणेशभक्तांच्या उत्साहाला मोठे उधाण आले होते. जिलह्यात गौरी -गणपती उत्सवापर्यंतच्या 55 हजार गणेशमूर्तींचे तर 16 हजार गौरींचे विसर्जन करण्यात आले.
गौरी-गणपती विसर्जनानिमित्त जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींकडून विसर्जन घटांवर विविध सुविधा निर्माण करून देण्यात आल्या. भाविकांना विसर्जनासाठी नदी, तलाव आणि समुद्रात उतरावे लागू नये यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. पीओपी व इतर साहित्य पाण्यात मिसळून पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली तसेच निर्माण संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.या दोन्ही ठिकाणीही नागरिकांनी प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले.
7 सप्टेंबरपासून सुरु झालेला यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात गेल्या पाच दिवसांपासून साजरा होत आहे. 7 सप्टेंबर रोजी रायगड पोलीस विभागात 1 लाख 3 हजार 296 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी 15 हजार 832 गौरींचे आगमन घरोघरी झाले. गेल्या पाच-सहा दिवसात बाप्पाच्या तयारीसाठी लागणार्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारामध्ये चांगलीच गर्दी अनुभवाला मिळाली. कोकणामध्ये गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे.
रायगड पोलीस विभागात 54 हजार 923 गणेशमूर्ती तर 15 हजार 832 गौरींचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरु होते. विसर्जनाच्या दिवशी वरुणराजाने पूर्ण विश्रांती घेतली होती.यामुळे निर्विघ्नपणे विसर्जन सोहळा रंगला. जिल्हयात ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती आणि गौरी विसर्जनासाठी रवाना झाल्या. पारंपरिक वाद्यांसह विविध प्रकारच्या डिजेच्या तालावर गणेश विसर्जन मिरवणुकाही काढण्यात आल्या. अकरा वाजेपर्यंत जिल्हयात विसर्जन सोहळा सुरु होता. जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी रायगड पोलीस विभागातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.