

खारजमीनीत वा क्षारपड जमीनीत कोणतेही पिक होऊ शकत नाही, असा गैरसमज वार्षानूवर्ष शासनस्तरावरच केला गेला असल्याने खारजमीनीतील शेती विकासासाठी शासनाच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येते. अलिबात तालुक्याच्या मोठे शहापूर गावांतील खारजमीनींतील मत्स्य तलावांच्या बांधांवर जून महिन्यात झेंडू लागवड, ऑगस्ट महिन्यात घेवडा, वाल हिरवी वांगी या भाज्यांचा प्रयोग यशस्वी करुन शासनस्तरावरील खारजमीनी नापिक आहेत, हा गैरसमज पूसुन काढण्यात यश मिळविले आहे.
कृषी पदवीधर असलेल्या मोठे शहापूर येथील पूनम भोईर व त्यांचे पती सचिन या दाम्पत्याने स्वतःचे 7 मत्स्यतलाव व भाड्याने 8 तलाव असे एकूण 15 मत्स्य तलाव घेऊन विविध माशांचे संगोपन व संशोधन गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सुरु केले. जुलै ते डिसेंबर या 6 महिन्यात मासे वाढवण्यासाठी प्रथम खर्च करावा लागतो, तेव्हा कुठे 250 ग्राम ते 500 ग्रामचा मासा तयार होतो. या दरम्यान खाद्य देण्यासाठी खर्च होतो, पण उत्पन्न जानेवारी पासून सुरु होतो.
या दरम्यानच्या काळात नवे उत्पन्न मिळवण्याचा शोध पूनम भोईर यांनी सुरु केला आणि त्यातून त्यांनी प्रथम जून महिन्यात झेंडूची लागवड तर ऑगस्ट महिन्यात घेवडा ,वाल तसेच हिरवी वांगी या भाज्यांची लागवड करुन यशस्वीरित्या उत्पादन घेतले. खारेपाटातील या क्षारपड जमिनीत त्यांनी झेंडूची 200 रोप लावून, एका दिवसाआड 10 किलो उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे , सरासरी 60 रुपये किलो या दराने दररोज त्यांना 600रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कृषी विभागाने 1000 रोपे दिली तर एकदिवसा आड 6 हजार रुपयांचे उत्पन्न सलग दोन महिने मिळू शकते आणि तलावातील मत्स्यशेती करणार्या शेतकर्यांच्या शुन्य उत्पन्न काळात देखील उत्पन्न चालू राहून , मत्स्य शेतीला हातभार लागू शकतो, असा विश्वास पूनम भोईर यांनी व्यक्त केला आहे. जानेवारी महिन्यापासून वांग्याचे उत्पादन सुरु होते. पूनम भोईर यांनी गतवर्षी एक टन वांगी विकल्याचे सांगीतले. तसेच रायगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असणार्या पोपटीसाठी लागणार्या वालाच्या शेंगा जानेवारी ते मार्च या तिन महिन्याच्या काळात मिळतात, असेही त्यांनी सांगीतले. कोकणातील ज्या क्षारपड जमिनीत काही जगत नाही, तेथे पूनम व सचिन भोईर या दाम्पत्यांने शेतकर्यांना नवा आशेचा किरण दाखवला आहे. यातूनच संपुर्ण कोकणातील खारेपाट समृद्ध होऊ शकतो आणि कोकणच्या कॅलीफोर्नियाचे स्वप्न साकारुन नवीन ग्रीनब्लू एमआयडीसी तयार होऊ शकते, असाही विश्वास भोईर दाम्पत्याने व्यक्त केला आहे. खारजमीनीतील मत्स्य तलावांच्या बांधावरील या व्यवसायातून बचत गट व उत्पादक गट सक्षम होऊ शकतात त्याच प्रमाणे श्युन्य उत्पन्न काळात खात्रीचे उत्पन्न मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे.