Raigad Flood Update | आभाळच फाटलं..! महाड, पोलादपूरला महापुराचा विळखा

सावित्री, गांधारी, काळ नद्यांचे पाणी सर्वत्र घुसले
Raigad Flood Update
महाड, पोलादपूरला महापुराचा विळखा
Published on
Updated on
महाड ः श्रीकृष्ण बाळ

महाड, पोलादपूर परिसरात जणू आभाळच फाटलयं....सावित्री, गांधारी, काळ या महाडवासियांच्या जीवनवाहिनी असणार्‍या नद्या आक्राळविक्राळ रुप धारण करुन सह्याद्रीच्या दर्‍या, खोर्‍यातून तांबड्याभडक पाण्यांचा लोटच्या लोट घेऊन प्रचंड वेगाने वहात आहेत. या नद्यांचे पाणी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी घुसल्याने महापुराचा प्रचंड विळखा महाडनगरीला पडलाय. पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास महाडची पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून शहरातील गंभीर पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मागील 24 तासात महाबळेश्वर येथे 330 पोलादपूर येथे 161 व महाड येथे 124 म्हणजे एकूण 715 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद शासकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले असून, सावित्री, काळ, गांधारी नद्यांना महापूर आला आ हे.या महापुराचे पाणी महाड शहरात सर्वत्र शिरल्याने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. येत्या 24 तासात पावसाचा जोर असाच वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने महाडची पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दादली पूल, दस्तुरी नाका, गांधारी नाका मार्गावरून वाहतूक थांबवली गेली आहे. किल्ले रायगड मार्गावर दरड कोसळली आहे.मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

जनजीवन विस्कळीत

मागील दोन दिवसापासून महाड शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात तसेच पोलादपूर व महाबळेश्वर परिसरामध्ये होणार्‍या मुसळधार पावसाने सकाळी पावणे सहाच्या सुमारास शहरात पाणी शिरले असून शहराच्या सखल भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या पाच प्रमुख प्रवेशद्वारापैकी तीन प्रवेशद्वारे मार्गावर पाणी आल्याने पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान किल्ले रायगड मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे. महाड नगर परिषदेच्या वतीने सकाळी पावणेसहा वाजता सावित्री नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजविण्यात आला. त्या पश्चात महाडमध्ये नगरपालिकेच्या वतीने सहा ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

एनडीआरएफचे पथक तैनात

मागील 15 जूनपासून महाडमध्ये सक्रिय असलेले एनडीआरएफचे पथक सध्या सुरू असलेल्या महापुराच्या संदर्भातील कार्यवाहीवर लक्ष ठेवून आहे. स्थानिक प्रशासन व एनडीआरएफच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील विविध ठिकाणी संभाव्य आपत्ती करिता सर्वांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.

महापुराने केली महाडची कोंडी

2021 च्या महाप्रलयाच्या आठवणी महाडकरांच्या ताज्या असतानाच सावित्रीने आज अखेर सर्व बंद झुगारून महाड शहरात सकाळी पावणेसहाच्या सुमारात प्रवेश केला असून महाड शहरांमध्ये येणार्‍रया पाच पैकी तीन वाटांवर या नदीच्या पाण्याने नागरिकांना मार्गावरून परावर्तन केले आहे. महामार्गावर शहरांतील विविध नागरिकांनी आपल्या मोठ्या गाड्या नेऊन ठेवल्याने या मार्गावरून ही वाहतूक करणे अडचणीचे झाल्याचे दिसून येते एका परीने सावित्री नदीतील आलेल्या या महापुराच्या पाण्याने महाड शहराची तीन दिशेकडून कोंडी केल्याचे चित्र अनुभवास येत आहे.

सावित्री नदीची धोक्याची पातळी 6.50 मीटर

गेल्या 24 तासापासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सद्यस्थितीमध्ये महिकावती मंदिराजवळ नदीची पाण्याची पातळी 6.50 पेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे. सर्व महाडकर नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नगरपरिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. शहरात कोणत्याही क्षणी सुकट गल्ली परिसरात तसेच सखल भागात पाणी शिरले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news