

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. आज सकाळी प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, महाडची जीवनवाहिनी असलेली सावित्री नदी धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचली आहे, तर रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
आज सकाळी ७ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार, जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्यांची स्थिती गंभीर बनली आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, सावित्री नदीची (महाड) सध्याची पाणी पातळी ६.४५ मीटर असून, इशारा पातळी ६ मीटर आहे तर धोका पातळी ६.५० मीटर आहे. सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असून, ती धोका पातळीपासून केवळ ०.०५ मीटर (पाच सेंटीमीटर) दूर आहे. कोणत्याही क्षणी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, त्यामुळे महाड आणि परिसरातील नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कुंडलिका नदीची (डोलवहाल बंधारा, रोहा) सध्याची पाणी पातळी २३ मीटर, इशारा पातळी २३ मीटर तर धोका पातळी २३.९५ मीटर आहे. कुंडलिका नदीने आपली इशारा पातळी गाठली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही नदीदेखील धोका पातळीकडे वाटचाल करू शकते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी सध्या नियंत्रणात असली तरी, प्रशासन त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अंबा नदीची सध्याची पाणी पातळी (नागोठणे): ५.७० मीटर, इशारा पातळी ८ मीटर आहे. पाताळगंगा नदीची पाणी पातळी (लोहोप): १९.७० मीटर तर इशारा पातळी २०.५० मीटर, उल्हास नदीची (कर्जत) पाणी पातळी ४५.१० मीटर तर इशारा पातळी ४८.१० मीटर, गाढी नदी (पनवेल) ४.०५ मीटर तर इशारा पातळी ६ मीटर आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसीलदारांना आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना हाय-अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. "नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु सावधगिरी बाळगावी. विशेषतः सावित्री आणि कुंडलिका नदीच्या काठावर राहणाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत," असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.