

महाड : MIDC येथील एम्बायो कंपनीत आग लागल्याची घटना घडली. औषधी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या आम्लीय पदार्थांचे उत्पादन सुरू असताना रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक प्रेशर निर्माण झाले. यामुळे छोटा स्फोट होऊन आगीला सुरुवात झाली.
घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अंतर्गत अग्नीशमन दलाने तात्काळ कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, एकाच महिन्यात कंपनीत घडलेली ही दुसरी घटना असल्याने कंपनीलगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाड MIDC पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात सुरक्षितता उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.