

रायगड ः केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत रायगड जिल्ह्यात भात व नाचणी ही दोन पिके अधिसूचित केली असून या योजनेत शेतकर्यांनी सहभागाची होण्याकरिता अंतिम मुदत 31 जुलै 2025 अशी निश्चित करण्यात आलेली होती. मात्र रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांनी शासनाच्या या पिक विमा योजनेकडे संपूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. 31 जुलै अखेर जिल्ह्यातील एकूण 3 लाख शेतकर्यांपैकी केवळ 9 हजार शेतकर्यांनी हा पिक विमा घेतला असल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या या पिक विमा योजनेतून भात व नाचणी पिकाच्या काढणी पश्चात पावसामुळे होणार्या नुकसानीला वगळले असल्याने या पिक विमा योजनेकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली असल्याचे शेतकरी गजानन म्हात्रे यांनी सांगीतले. गेल्या पाच ते सहा वर्षांचा अनूभव विचारात घेता, सर्वसाधारणपणे भात आणि नाचणी पिकाची कापणी केल्यावर त्यांचे भारे शेतात रचून ठेवल्यावर पाऊस आला आणि सर्व पिक भिजून मोठे नुकसान झाले होते.
आता कापणी नंतर पिकाचे नैसर्गिक पावसामुळे नुकसान झाल्यास त्यांची नुकसान भरपाई पिक विमा योजनेतून मिळणार नाही, मग या विम्याचा उपयोगच काय असा प्रश्न माझ्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना पडलेला आहे. दरम्यान, ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकर्यांना 14 ऑगस्ट व कर्जदार शेतकर्यांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी देखील केवळ 34 हजार शेतकर्यांनी घेतला होता विमा
गेल्या वर्षी देखील रायगड जिल्ह्यात पिक विमा घेणार्या शेतकर्यांचे प्रमाण कमीच होत. एकूण 34 हजार शेतकर्यांनी हा विमा घेतला होता. मात्र अनेकांना झालेल्या नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत. यातून देखील मोठी नाराजी शेतकर्यांमध्ये असल्याचे प्रयोगशिल शेतकरी दत्तात्रेय पाटील यांनी सांगीतले.कोकणासाठी खरिप हंगामातील पिक विमा योजनेचे निकष शासनाने तपासून घेवून येथील वास्तवावर आधारीत पिक विमा योजनेचे निकष ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केली आहे.
निकष बदल शासनाचा धोरणात्मक निर्णय पिक विमा योजनेच्या निकषातील बदल हा शासनाचा धोरणात्मक बदल आहे. यामध्ये कृषी विभागा काही करु शकत नाही. परंतू पिका नुकसानी टाळण्याकरिता शेतकर्यांनी पिक विमा घेणे आवश्यक आहे.
वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड