

रायगड ः जयंत धुळप
कृषी कर्जमाफी सरकार करणार असल्याने रायगड जिल्ह्यातील 2 हजार 952 शेतकर्यांनी बँकांकडून गतआर्थिक वर्षांत घेतलेल्या आपल्या कर्जाची परतफेड बँकांना अद्याप केली नसल्याने त्यांची कर्जे थकीत झाली आहेत. या सर्व शेतकर्यांची थकीत 20 कोटी रुपयांची रक्कम आता वसूल करण्याचा यक्षप्रश्न जिल्ह्यातील बँकांसमोर उभा राहीला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. हा मुद्दा प्रचार सभांच्या माध्यमातून गावागावात आवर्जून सांगीतला गेला होता. मात्र अजूनही हि कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी चिंतेत असून शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत. रायगड जिल्ह्यात शासन नियूक्त अग्रणी जिल्हा बँक म्हणून बँक ऑफ इंडिया सर्व बँकाच्या समन्वयाचे काम पहाते.
वविध राष्ट्रीयीकृत बँकाकडून होणार्या जिल्ह्यातील कर्ज पतपूरवठ्याचे नियोजन देखील बँक ऑफ इंडिया तयार करित असते. या अंतर्गतच कृषी कर्ज वितरण जिल्ह्यातील शेतकर्यांना विविध बँकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील 2 हजार 952 शेतकर्यांना एकूण 20 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रांतील एकूण 12 बँकांच्या माध्यमातून 2 हजार 822 शेतकर्यांना 17 कोटी 2 लाख रुपये तर खासगी क्षेत्रातील चार बँकाच्या माध्यमातून 2 कोटी 86 लाख रुपये कर्ज वितरणाचा समावेश आहे.
शेतकर्यांच्या आशा आज पुन्हा पल्लवीत
निवडणुकीच्या काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ते सरकार पूर्ण करणार आहे. अजून सरकारचा कार्यकाळ 4 वर्ष आहे. शेतकर्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे, मात्र योग्य शेतकर्याचंच कर्ज माफ झालं पाहिजे. मोठ्या शेतकर्यांऐवजी खरंच गरजू आणि पात्र असतील अशा शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला मदत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी भूमीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच संभाजीनगर येथे पत्रकारांळी बोलताना स्पष्ट केली आहे. परिणामी कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकर्यांच्या आशा पून्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.