

माणगाव : कमलाकर होवाळ
कोकणातील भातशेती ही पावसाच्या आगमनाशी अतूट नाते सांगणारी शेती आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस शेतकरी भाताचे बियाणे पेरून रोपवाटिका तयार करतात आणि साधारणपणे ६ ते ७ जून दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे लावणीच्या कामांना गती येते. मात्र यंदा हवामानातील सततच्या लहरी बदलांमुळे मान्सून तब्बल २० दिवस उशिराने दाखल झाला आणि त्याचा थेट परिणाम माणगाव तालुक्यातील भात लागवडीच्या वेळा पत्रकावर झाला. संपूर्ण लागवड प्रक्रिया सुमारे २० दिवस मागे पडली असली, तरी शेतकऱ्यांच्या सजगते मुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दुबार पेरणीचे मोठे संकट मात्र टळले आहे.
मान्सूनच्या लहरी पणाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता गेल्या काही वर्षांपासून बदलते हवामान कोकणातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कधी मान्सूनपूर्व पाऊस अकाली कोसळतो, तर कधी मान्सून आल्या नंतरही पावसाचा मोठा खंड पडतो. या अनिश्चिततेमुळे पेरणीचे आणि लावणीचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. गतवर्षी नेमकी याउलट स्थिती होती २० मे रोजीच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यानंतर पाऊस सातत्याने सुरू राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना वेळेत धूळवाफ पेरणी करता आली नाही.
याचा परिणाम भात लागवडीखालील क्षेत्र घटण्यावर झाला आणि अनेक शेतकरी कुटुंबांना त्याचा थेट आर्थिक फटका सहन करावा लागला. गतवर्षीच्या अनुभवातून शिकत यंदा शेतकऱ्यांनी वेळेत धूळवाफ पेरणी पूर्ण केली असून गतवर्षीच्या कटू अनुभवातून धडा घेत, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत मिळताच माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीसच मोठ्या प्रमाणावर धूळवाफ पेरणी पूर्ण करण्याला प्राधान्य दिले.
तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होण्यापूर्वीच पेरणीची कामे उरकून घेतली. प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस सुरू होण्यासाठी त्यानंतर जवळपास ३० दिवसांचा कालावधी लागला. परिणामी भात लावणीला उशीर होत असला, तरी रोपवाटिकांची स्थिती समाधानकारक राहिल्याने शेतकरी वर्गात आशेचे वातावरण आहे. सध्या पाऊस सक्रिय झाल्याने तालुक्यात सर्वत्र शेती कामांची लगबग वाढली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार मॅट नर्सरी पद्धतीचा वाढता वापर शेतकरी करीत असून बदलत्या आणि लहरी हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. यंदा तालुक्यातील सुमारे ९३ एकर क्षेत्रावरील भात लागवडीसाठी प्लॅस्टिक ट्रेमधील 'मॅट नर्सरी' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीत कमी पाण्यात, कमी कालावधीत दर्जेदार आणि निरोगी रोपे तयार होतात, ज्यामुळे पावसाच्या अनिश्चितते मुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.
कृषी तज्ज्ञांच्या मते, भविष्यात हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अशा आधुनिक व कमी पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात माणगाव तालुक्यात ७ हजार १६५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. यंदा सुरुवातीच्या पावसाच्या विलंबामुळे रोपवाटिका तयार करण्यास उशीर झाला असला, तरी कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात सध्या ६९५ हेक्टर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने भात रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत, तर ९३ एकर क्षेत्रावर मॅट नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
ही आकडेवारी पाहता, परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालत शेतकरी परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचे स्पष्ट होते. सध्या तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे रोपवाटिकांना पोषक वातावरण मिळाले असून भाताची रोपे जोमाने रुजली आहेत. रोपांची वाढ चांगली असल्याने आगामी काही दिवसांत लावणीच्या कामांना मोठा वेग येण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज यापुढे अनुकूल राहिला, तर यंदाच्या हंगामात भात उत्पादनाबाबत सकारात्मक चित्र निर्माण होऊ शकते, अशी आशा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हवामानाधारित शेती नियोजन, सिंचन सुविधांचा विस्तार, पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार यावर अधिक भर देणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. शेतकरी हा अनेक संकटांशी झुंज देत, तरीही न डगमगता अन्नदाता म्हणून उभा आहे. त्याला आर्थिक आणि तांत्रिक दृष्टीने अधिक सक्षम करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
पंकज तांबे, संस्थापक, स्वराज्य संघटना, रायगड