

दोडामार्ग : तिलारी धरण क्षेत्रालगत शिरंगे गाव हद्दीतील काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी सुरू असलेले खानयाळे ग्रामस्थांचे साखळी उपोषण आठव्या दिवशी मागे घेण्यात आले.
शिरंगे येथील कार्यरत अल्पमुदत गौण खनिज परवाने तसेच काळा दगड खाणपट्टा परवाने पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पारित केल्याने लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या खानयाळे ग्रामस्थांच्या उपोषणाला यश आले आहे.
पालकमंत्री नीतेश राणे यांची मध्यस्थी निर्णयाक ठरली. त्यांचे प्रतिनिधी सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते प्रशासनाच्या या आदेशाची प्रत उपोषणकर्त्यांना देत सुहास शेटये व संकेत शेटये यांना लिंबूपाणी दिले.
धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे सुरू असलेले उत्खनन कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी येथील शीव परिसरात 6 मार्चपासून साखळी उपोषणास सुरुवात केली. दरम्यान प्रशासनाने वेगवेगळी आश्वासने देत उपोषण मागे घेण्याची विनंती उपोषणकर्त्यांकडे केली. मात्र आम्हाला आश्वासन न देता या खाणी कायमस्वरूपी बंद करण्याचे लेखी पत्र द्या. जोपर्यंत हे पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, या भूमिकेवर उपोषण कर्ते ठाम राहिल्याने उपोषण सुरूच राहिले.
पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनीही धरणालगतच्या खाणपट्ट्यांची पाहणी करत राखीव वनसंवर्धन क्षेत्रात खाणींना परवानगी दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच हे बेकायदेशीर कृत्य असल्याचेही मत व्यक्त केले. उपोषणकर्त्यांच्या मागणीवर ठोस कार्यवाही होऊ न शकल्याने हे उपोषण सातव्या दिवशीही सुरू होते. अखेर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या खाणी बंद करण्याचे आदेश काढले.
तिलारी धरणालगतच्या काळ्या दगडाच्या खाणींमुळे धरणास धोका आहे की नाही? याबाबतची तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांना जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. शिरंगे गावातील उपलब्ध पाणी स्त्रोताबाबत तपासणी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचा आदेश वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. तर पुढील आदेश होईपर्यंत या खाणी बंद कराव्यात.
याबाबत संबंधितास सूचना देऊन संबंधितांनी उत्खनन अथवा वाहतूक केल्यास त्यांच्यावर नियमोचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी व दोडामार्ग तहसीलदार यांना जिल्हाधिकारी पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान या उपोषणाची गोवा सरकारने दखल घेत त्यांच्या जलस्त्रोत विभागाच्या अधिकार्यांमार्फत धरणाची वस्तुस्थिती जाणून घेत अहवाल सादर करण्याच्या सूचना गोवा राज्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या जलस्त्रोत विभागाच्या अधिकार्यांनी धरणालगत असलेल्या खाणींची पाहणी केली.
पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिनिधी सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी गुरुवारी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ना. राणे यांनी खाणी बंद करण्याबाबत सूचना प्रशासनाला केल्या. शिवाय पालकमंत्री सदैव तुमच्या सोबत असल्याचे मनीष दळवी यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले. खाण बंदी आदेशाची प्रत उपोषणकर्त्यांना देत सुहास शेटये व संकेत शेटये यांना लिंबूपाणी दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.