Raigad | रायगडमध्ये शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड

Maharashtra Assembly Elections | महाड, अलिबाग, पनवेल, उरण, कर्जतमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन, शेवटच्या दिवशी 93 अर्ज दाखल
Raigad ,Maharashtra Assembly Elections
रायगडमध्ये शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबडFile Photo
Published on
Updated on

रायगड ः रायगड जिल्हयात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता मोठी चढाओढ पहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी (29 ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी जिल्हयातील सातही विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. राज्यात भाजप-शिवसेना शिंद गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाआघाडी अशी लढत असताना उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीत उमेदवारीवरून नाराजीचा अधिक सूर दिसून येत आहे.

अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेकाप महाविकास आघाडीतच असल्याचे सांगून शेकापने चित्रलेखा पाटील यांचा यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आघाडीमधून दोन अर्ज दाखल झालेले दिसतात. तसाच प्रकार महायुतीबाबत येथे वेगळे चित्र नाही. महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी काल सोमवारी अर्ज दाखल केला आहे. आज भाजपाचे नेते दिलीप भोईर यांनी शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे येथे महायुतीतही बिघाडी दिसत आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने आपण उमेदवारी दाखल केली नसल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी जाहीर केले. तर राजेंद्र ठाकूर यांनी येथून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

आज पनवेल 188 विधानसभा मतदारसंघामधून शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. येथे महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने येथे सरळ लढतीचे चित्र आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. यावेळी थोरवे यांनी पोसरी येथील निवासस्थान शिवतीर्थ येथून भव्य रॅली काढत महायुतीचा उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. यावेळी महायुतीचे व शिवसेना शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

194 महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी महायुतीतर्फे विशाल रॅलीचे व जाहीर सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आ. प्रवीण दरेकर, माजी आमदार श्याम सावंत, मुश्ताक अंतुले, अनिकेत तटकरे, सुषमा गोगावले यांसह महायुतीच्या महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरण विधानसभा मतदारसंघात मंगळवारी शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंद गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर महाविकास आघाडीतर्फे शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनीही आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. येथे यापूर्वी महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे आघाडीपुढे अडचणी आहेत.

पेण विधानसभा मतदारसंघात आज मंगळवारी शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्षातर्फे अतुल म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे भाजप विरुद्ध शेकाप अशी लढत दिसून येते आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आज मंगळवारी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अनिल नवगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनीही येथे अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला असल्याने येथे आघाडीसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.

अर्जाची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे.

रायगड जिल्हयातील सातही विधानसभा मतदारसंघात आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंद गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाआघाडीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार भरत गोगावले, कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, उरणमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर महाविकास आघाडीतर्फे श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नवगणे, पनवेलमध्ये शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, उरणमध्ये शेकापचे प्रीतम म्हात्रे, पेणमध्ये अतुल म्हात्रे तर अलिबागमध्ये भाजप नेते दिलीप भोईर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news