

पनवेल : सातबारा उताऱ्यावर नाव नोंद मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन नाना माने याला अटक करण्यात आली होती. त्याला बुधवारी (दि.२०) पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या पत्नीने मौजे पनवेल गावदेवी पाडा परिसरातील जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या पत्नीच्या नावाची नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी गोवर्धन माने याने ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत १६ मे रोजी रायगड एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने १८ आणि १९ मे रोजी पडताळणी केली असता, माने यांनी तक्रारदाराकडे सातबारा नोंद मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रायगड एसीबीने सापळा रचला. १९ मे रोजी पनवेलमधील तक्का परिसरात पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना माने याला पथकाने रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी त्याला पनवेल न्यायालयात हजर केले असता तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
रायगड एसीबीच्या या कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महसूल विभागातील विविध कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर येत होत्या. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा दलालांचा सहभाग आहे का? याचाही तपास एसीबीकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.