

महाड : ऐतिहासिक तसेच सामाजिकदृष्ट्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या महाड दगरीच्या पश्चिम दिशेकडील प्रवेशद्वारावर असणार्या हापूस तळाच्या सुशोभीकरणाने महाड शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून या शहराच्या मुख्य मार्गावरील या हापूस तळ्याला नवी झळाळी प्राप्त होणार असल्याची माहिती नगरपरिषद बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी दिली आहे.
महाड शहरातील गांधारी नाका परिसरात असलेले ऐतिहासिक हापूस तळ्याला आता नव्याने झळाळी येणार आहे. महाड नगरपालिकेने हापूस तळ्याच्या सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले असून सुमारे 4 कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे महाड शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.
ऐतिहासिक तळे म्हणून ओळख महाड शहरातील या हापूस तळ्याची ओळख आहे. महाड शहरातील विविध भागात अनेक प्राचीन तळी आहेत. त्यातील चवदार तळे जागतीक नकाशावर आहे. गांधारीनाका परिसरात महाड शहरात प्रवेश करणार्या मुख्य रस्त्यालगत हापूस तळे आहे. इतिहास काळात महाड हे बंदर होते व येथून मोठ्या प्रमाणात धान्ये व वस्तुची उलाढाल होत असे. त्याकाळी रस्ते, पूल या सुविधा नव्हत्या. तेव्हा होडीनेच सामानाची वाहतूक होत असे. या होड्यांवर हबशी म्हणून काम करणारे या ठिकाणी पाण्याची सोय असल्याने मुक्कामाला उतरत असत. काम संपल्यावर माघारी जात त्यामुळे या तळ्याला हाबूस व नंतर हापूस तळे असे नाव पडल्याचे जूने जाणकार सांगतात. हे तळे बुजलेले होते. तर आतमध्ये रानटी वनस्पतीही उगवलेल्या होत्या. परिसरातील इमारतींचे सांडपाणीही या तळ्यात जात होते. असे हे तळे अनेक वर्षे दुर्लक्षित होते. आता या तळ्याचा विकास नगर पालिकेने हाती घेतला आहे. तळ्यातील गाळ काढून उत्पाद देखील तयार करण्यात आला, परंतु यानंतर मात्र महाडमध्ये 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साठला होता. तर फुटपाथ काम देखील खराब झाले. परंतु आता पुन्हा सध्या तळे साफ करण्याचे काम सुरू आहे. तळ्याचे खोदकाम केले जाणार असून गॅब्रियन वॅाल बांधल्या जाणार आहेत. तळ्याच्या भोवती सुमारे पाचशे मिटरच्या लांब व सोडेचार फूट रुंद ट्रॅक राहणार आहे, भोवताली बाग, स्वच्छतागृह, पायर्या व बाजूने सांडपाणी झिरपू नये यासाठी गटारांची सुविधा केली जाणार आहे.
सुशोभीकरण कार्यक्रम गतीने पूर्ण व्हावा असे स्पष्ट निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले असून, कामासाठी तब्बल चार कोटी रुपये खर्च होणार आहे यासाठी दोन कोटी रुपये यापूर्वी मंजूर झाले असून नव्याने दोन कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता सुखके करण्याचे काम वेगाने पूर्ण होणार आहे. 2019 मध्ये तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले.