

जयंत धुळप
रायगडः रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यांतील उसर येथे गेल (इंडिया) कंपनीच्या माध्यमातून तब्बल ११ हजार २५६ काेटी रुपये गुंतवणूक केली आहे. याठिकाणी नविन पीडीएच-पीपी प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु आहे. पण गेल्या एक महीन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारामुळे हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.
परदेशी मशिनरी घेऊन आलेली अवजड वाहनांने रस्त्यावर उभी
गेल्या ३ नाेव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी अचानकपणे अलिबाग-उसर रस्त्यावरील वढाव आणि वेलवली या दाेन गावाच्यामध्ये असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा छोटा पुल कोसळला. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाला पर्यायी व्यवस्था गेल्या महिनाभरापासून केलेली नाही. परिणामी गेल इंडियाच्या उसर येथील प्रकल्पासाठी येणारी परदेशी मशिनरी घेवून येणारी सर्व अवजड वाहनांची वाहतुक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. काेट्यावधी रुपये किमतीची मशिनरी घेवून येणारी ही अवजड वाहने तळाेजा, जेएनपीए, पनवेल, पेण येथे रस्त्याच्या बाजूला गेला महिनाभर धूळ खात उभी आहेत.
गेल कपंनीचे प्रशासनाकडून सतत पाठपूरावा, पण शासन सुस्त
गेल कपंनीचे प्रशासन अधिकारी व संबंधित ठेकेदारांकडून अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे नविन बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिना झाला तरी अद्याप पर्यंत या कोसळलेल्या पुलाच्या नविन बांधकामाची सुरवात देखील केलेली नाही.
प्रकल्प उभारणीपूर्वीच माेठा आर्थिक फटका, राेजगारावर परिणाम
गेल इंडीया कपंनीच्या नविन प्रकल्पाच्या उभारणीकरिता आवश्यक असणारी देश-विदेशातून आलेली उपकरणे घेऊन आलेली अवजड वाहने अलिबागच्या अलिकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत उभी करण्यात आलेली आहेत. यामुळे प्रकल्प उभारणीचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे ही उपकरणे वाहतुक करणारी अवजड वाहने गेल कंपनीचे उसर येथिल नविन प्रकल्पापर्यंत पोहचू न शकल्यामुळे याचा परिणाम प्रकल्प उभारणीच्या कामावर व संबंधित ठेकदारांकडे काम करत असलेल्या लोकांच्या रोजगारावर होण्याची माेठी शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबाग-उसर रस्त्यावरील वढाव आणि वेलवली या दाेन गावाच्यामध्ये असलेला अलिबाग सार्वजनीक बांधकाम विभागाचा पूल नव्याने बांधण्याकरिता प्रस्ताव सावर्जनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मंजूरी करिता पाठविला आहे. लवकरच मंजूरी हाेवून पूलाचे काम सुरु हाेणे अपेक्षीत आहे
- संदेश शिर्के, मुख्य कार्यकारी अधिकारी,रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण