

खांब : रोहा-पालदाड मार्गावर रविवारी (१३ सप्टेंबर) रोजी दुपारच्या सुमारास चारचाकी गाडी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एक तरुण दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालदाड मार्गावरून एक तरुण आपल्या दुचाकीवरून जात होता. दरम्यान, समोरून येणाऱ्या कारशी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच कारच्या डाव्या बाजूच्या हेडलाईट आणि बंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. वाढत्या अपघातांमुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.