Raigad accident | मुरबाडहून जेजुरीला निघालेल्या भाविकांचा अपघात, अनेक जखमी

सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविले
Raigad accident | मुरबाडहून जेजुरीला निघालेल्या भाविकांचा अपघात, अनेक जखमी
Published on
Updated on

अंकुश मोरे

खालापूर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील HOC ब्रिजच्या उतारावरील धोकादायक वळणावर आज दि. १३/०५/२०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या दरम्यान फोर्स मिनी बस क्रमांक MH.06.BW.4030 हिचा भीषण अपघात झाला. भरत रमेश शेळके या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीबस रस्त्यावर पलटी झाली.

सदर मिनीबस ही मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा येथून जेजुरीकडे निघाली होती. अपघातामध्ये बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये कमलाबाई रामचंद्र माळी, गुरुनाथ डोंगरे, बाळाराम भोईर, रवींद्र राम माळी, गुलाबबाई दत्तू हुमणे, अशोक जयराम डोंगरे, कस्तुरी गणेश माळी आणि मीनाबाई गुरुनाथ डोंगरे यांचा समावेश आहे. सर्व जखमी हे मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट विभाग, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स तसेच हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविले.

बस अपघातातील जखमींवर प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोपोली नगरपालिका रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना MGM हॉस्पिटल, पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news