

रायगड ः जिल्हा आरोग्य विभागामार्फत सिकलसेल, थैलेसेमिया व हेमोफिलिया या आनुवंशिक रक्तविकारांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी 11 ते 17 डिसेंबरदरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात सध्या एकूण 510 सिकलसेल वाहक आणि 57 सिकलसेलग्रस्त रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
त्यापैकी 22 रुग्णांना हायड्रॉक्सियुरिया हे औषध उपचारासाठी सुरू करण्यात आले असून, त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तसेच इतर रुग्णांना नियमित फॉलिक ॲसिड देण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व गर्भवती महिलांची प्रसूतीदरम्यान सिकलसेल तपासणी केली जाते आणि जर त्या वाहक अथवा रुग्ण आढळल्या, तर त्यांच्या पतीचीही तपासणी करण्यात येते. सिकलसेल जनजागृती सप्ताहात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत.
सिकलसेल, कॅल्सेमिया, हेमोफिलिया तपासणी शिबिरे, हिमोग्लोबीन चाचणी आणि सिकलसेल सॉल्यूबिलीटी टेस्ट, आजाराची लक्षणे, प्रसार व प्रतिबंधक याविषयी जनजागृती, गर्भवतींसाठी विशेष तपासणी व समुपदेशन, शाळा महाविद्यालयांत माहितीपर व्याख्याने, समुपदेशन करण्यात येत आहे. तिन्ही आजार आनुवंशिक असून, तपासणीमुळे त्यांचे लवकर निदान शक्य होते. दोन्ही पती-पत्नी वाहक असल्यास त्यांच्या बाळामध्ये आजाराचा धोका वाढतो. नियमित तपासणी, वेळेवर उपचार आणि समुपदेशनामुळे आजाराचे दुष्परिणाम कमी करता येतात.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती आठवड्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. दरम्यन रक्तविकारांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी 11 ते 17 डिसेंबरदरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.