

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांमध्ये सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याचा बिमोड करण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने सुरु केली आहे. या मोहिमेचा प्रारंभा राजापूर तालुक्यातील नाटे येथील बांदकरवाडीतून झाला आहे. शुक्रवारी रात्री टाकलेल्या छाप्यात या ठिकाणाहून 1 लाख 97 हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीररित्या मद्य विक्री करणार्या ईश्वरसिंग रामचंद्र बांदकर (46) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री होते. परवानाधारकांचा व्यवसाय या बेकायदेशीर मद्य विक्रीमुळे धोक्यात आले आहेत. त्यामुळे परवानाधारकांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी होऊ लागल्या. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी रत्नागिरी जिल्हा भरारी पथकासह सर्व युनिटना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर पथकातील सहकारी दुय्यम निरीक्षक जी. सी. जाधव, एस. बी. यादव, जवान मानस पवार, वैभव सोनावले, व्ही. के. भोसले, एस. टिकार, एन. जे. तुपे यांनी कारवाईला प्रारंभ केला आहे.
राजापूर तालुक्यातील नाटेतील बांदकरवाडी येथे सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने शुक्रवारी छापा मारला. या कारवाईत बॉम्बस् लेमन होडका मद्याचे 22 बॉक्स सापडले. या बॉक्समध्ये 1056 बाटल्या मिळाल्या असून त्यांची किंमत 1 लाख 58 हजार 400 इतकी आहे. इतर 35 बाटल्या कापडी पिशवीमध्ये मिळाले असून यांची किंमत 5,250/- इतकी आहे. कारवाईत मॅगडॉल नंबर 1 नामक व्हिस्कीच्या बाटल्या मिळाल्या असून त्याची किंमत 17,280/- इतकी आहे. या प्रकरणी ईश्वरसिंग रामचंद्र बांदकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मद्यासह कारही जप्त करण्यात आली असून चालक नितीन सांळुखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने दारूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री होणार्या ‘ओल्या पार्टी’साठी गोवा विदेशी मद्याची महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने महामार्गावर गस्त सुरु केली आहे. राजापुरातील हातिवले - जैतापूर मार्गावर गोवा मद्याची वाहतुक करणारी अल्टो कारमध्ये 1 लाख 58 हजार किमतीच्या मद्यासह 1 लाख 40 हजार रुपये किमतीची अल्टो कारही जप्त करण्यात आली आहे. ही मद्य वाहतुक करणार्या नितीन चंद्रकांत साळुंखे, (45, रा. कणकवली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडाळकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी जवानांनी महामार्गावर गस्त सुरु केली आहे. नविन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी होणार्या पार्ट्यांसाठी दरवर्षी गोवा बनावटीच्या मद्याची राज्यभर रेलचेल होत असते. दरवर्षीच्या या अनुभवामुळे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी महामार्गावरील गस्त परिणामकारक करण्याच्या सुचना केल्या आहेत. रत्नागिरी भरारी पथक शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना हातीवले -जैतापूर मार्गावर अल्टो कार थांबवून तपासण्यात आली.