

रायगड ः रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड पोलीसांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरु केलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत बुधवारी खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील चौक येथे 4 लाख रुपये किमतीच्या 16 किलो गांजा या अंमली पदार्थासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या या तिघांमध्ये ओडीसा राज्यातील गोजाम जिह्यातील पिठानपल्ली येथील मनोज गौरांग प्रधान (35), टेलरींगचा व्यवसाय करणारा चंदन पुर्णा प्रधान (29) आणि चेंबूर वाशी नाका येथील आकाश सोसायटीत राहाणारा रिक्षा चालक प्रवीण प्रेमचंद गुप्ता (38) यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेला हा 16 किलो गांजा अमलीपदार्थ ते कोणार्क एक्स्प्रेस रेल्वेने आणत असल्याची माहिती पोशि ओमकार सोंडकर यांंना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.
त्या माहितीची खातरजमा करुन जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मिलींद खोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाळत ठेवून ही कारवाई केली आहे.
कारवाई करणार्या या विशेष पोलीस पथकात पोनि सचिन पवार, सपोनि भास्कर जाधव, पोउनि बहाडकर, पोशि ओमकार सोंडकर, पोह सुदिप पहेलकर, पोह शिंदे, पोशि बाबासो पिंगळे, पोह श्यामराव कराडे, पोह अक्षय जाधव आणि पोह शिंदे यांचा समावेश होता. रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यात गांजा व अमली पदार्थांविरोधात रायगड पोलीसांनी धडक कारवाई केली आहे.