नेरळ : नेरळमधील खांडा येथील टिवाले हॉटेल येथे असलेल्या शीतपेयाच्या हातगाडीला असलेल्या विजेचा शॉक लागून एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव रायमिन रफिक खान असे आहे. या घडलेल्या दुर्देवी घटनेनेमुळे नेरळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेरळ पूर्व परिसरात बोपेले हजारे नगर येथे राहणारे अंधत्व असलेले रफिक खान यांची सहा वर्षीय रायमिन या मुलीचा हात शीतपेयाच्या गाडीला लागाल.त्या गाडीवर असलेल्या विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला. रफिक रवान हे अंध असल्याने त्यांच्यासह त्यांचे कुटुंब पत्नी, दोन लहान मुली व एक लहान मुलगा असे मिळून नेरळ बाजारपेठ व परिसरात भिक्षा मागून आपली गुजराण करीत होते. नेहमीप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेले पीडित कुटुंब हे नेरळ बदलापूर राज्य मार्गावरील नेरळ खांडा येथील नेरळ ममदापूर चौकात असलेल्या सरफराज टिवाले यांचे टीवाले फॅमिली हॉटेल येथे आले असताना ही दुर्घटना घडली.
या घटनेची खबर नेरळ पोलीस ठाण्यात दिली. तर मृत मुलीची आई पराविन रफिख खान वय वर्ष 35 हीने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याप्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूप्रमाणे नोंद करण्यात आलेली आहे. तर पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षक ज्ञानदेव दाहातोंडे हे करीत आहे.