

अलिबाग : अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणार्या ओयोशान येथील कुंटणखान्यावर अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व बांगलादेशी प्रतिबंधात्मक पथक यांनी संयुक्त कारवाई करीत हॉटेलमालक पती, पत्नीसहित इतर तीन मुलींना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे अलिबागमध्ये खळबळ माजली आहे. यापूर्वीही शहरातील काही हॉटेल्समध्ये असे अनैतिक प्रकार उघडकीस आलेले होते.
चेंढरे हद्दीत असणार्या ओयोशान येथे शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल यांच्या देखरेखेखाली कुंटणखाना सुरू होता. हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांना शारीरिक संबंधासाठी मुली पुरवून लैंगिक अत्याचार करीत असल्याची महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली होती. मिळालेली माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी उपअधीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहिती दिली. मंगळवारी ( 17 डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, बांगलादेशी प्रतिबंधात्मक पथक यांनी एकत्रित येत हॉटेलमध्ये प्रवेश केला. तेव्हा पहिल्या माळ्यावरील रिसेप्शन काउंटर येथे असलेल्या शैलेश प्रभाकर तांडेल, शलाका शैलेश तांडेल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर उपस्थित पंचासमक्ष हॉटेलची पाहणी केली असता तीन मुली ह्या वेश्याव्यवसाय करीत असतांना मिळून आल्या आहेत. हॉटेल ओयोशान येथील कुंटणखाना सुरू असल्याची फिर्याद अलिबाग पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उप निरीक्षक अनिल गोसावी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.