

पनवेल : रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या रंग पंढरी संस्थेच्या बरड एकांकिकाने अटल करंडकवर आपले नाव कोरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरविण्यात आले.
यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन रंगकर्मीचा गौरव करण्यात आला. पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अविनाश कोळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल पालिकेचे उपयुक्त गणेश शेट्ये, तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते गिरीश ओक, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अभिनेते सुनील तावडे, दिगदर्शक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्यवाह अजित भुरे, अभिनेता जयवंत वाडकर, भरत सावले, नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष विलास कोठारी, निर्माता संजय पाटील, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर अभिनेते सुव्रत जोशी, अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद शेलार, प्रमोद अत्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महाअंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी आणि अभिनेते सुनील तावडे यांनी केले. अभिनेते व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी त्यांच्या खास विनोदी आणि प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचे इतर मानकरी
द्वितीय क्रमांक- सपान (डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटल, मुंबई), तॄतीय क्रमांक- स्वातंत्र्य सौभाग्य (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड),
उत्तेजनार्थ बक्षिसे - प्रतीक्षायान (नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय, अंधेरी),
उत्तेजनार्थ बक्षिसे - रेशनकार्ड (अमर हिंद मंडळ, दादर),
लक्षवेधी एकांकिका- हॅशटॅग इनोसंट- अलडेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेज, पालघर), परिक्षक पसंती एकांकिका - किचकवध पुन्हा- (सीकेटी स्वायत्तम महाविद्यालय, पनवेल)