

पनवेल: यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती तसेच सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच करावे लागणार आहे.
याशिवाय पीओपी मूर्तींच्या उत्पादक व विक्रेत्यांनी प्रत्येक मूर्तीच्या मागील बाजूस ऑईल पेंटने स्पष्ट दिसेल असे लाल रंगाचे गोल चिन्ह करणे बंधनकारक करण्यात आले असून, मूर्ती विक्री करताना ग्राहकांना विसर्जनासंदर्भातील शासनाच्या नियमांची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती अध्यक्ष बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रीतम म्हात्रे तसेच प्रशासनाच्या वतीने पर्यावरण विभागाचे उप आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे, विभाग प्रमुख मनोज चव्हाण, पर्यावरण विभगाचे प्रवीण व्हळगल यांच्यासह पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार मूर्ती विक्रेते, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि न्यायालयीन निर्देशांनुसार साजरा करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने सोमवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मूर्तिकार, मूर्ती विक्रेते, स्वयंसेवी संस्था व पर्यावरण क्षेत्रातील संघटनांची आढावा बैठक आयोजित केली होती.
बैठकीत पर्यावरण विभागाचे उपआयुक्त स्वरूप खारगे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषतः लाल गोल चिन्हामुळे ग्राहकांना पीओपी मूर्ती सहज ओळखता येईल आणि विसर्जनाच्या योग्य पद्धतीबाबत जागरूकता वाढेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या "उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा" या उपक्रमांतर्गत शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेची माहिती देण्यात आली. बैठकीत कृत्रिम तलावांची संख्या वाढविणे, पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढविणे, जनजागृती मोहीम राबविणे तसेच शाडू मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था आणि मूर्तिकारांनी केली.
समारोपावेळी महापौर नितीन पाटील यांनी उपस्थितांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देत सर्वांनी न्यायालयीन आदेश आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) २०१० मध्ये काढलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीओपीच्या मूर्तीच्या नैसर्गिक जलाशयातील विसर्जनावर थेट बंदी नव्हती, मात्र मंडळाच्या २०२० च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 'पीओपी' मूर्ती घडवणे, विक्री आणि विसर्जनावरही बंदी घालण्यात आली.
ही मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक असल्याची भूमिका वेळोवेळी राष्ट्रीय हरित लवाद, विविध उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. वेळो वेळी येणाऱ्या निर्णयामुळे मूर्तीकार आणि गणेश भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा मूर्ची व्यवसायावर झाला आहे.
शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन
यावेळी महापालिकेच्या 'उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा' या उपक्रमांतर्गत शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेची माहिती देण्यात आली. बैठकीत कृत्रिम तलावांची संख्या वाढविणे, पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढविणे, जनजागृती मोहीम राबविणे तसेच शाडू मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था आणि मूर्तिकारांनी केली.