

कळंबोली (रायगड) : दीपक घोसाळकर
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती , महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका दिवाळीच्या उत्सवापासून सुरू केला आहे. दिवाळीमध्ये आपल्या पक्षाची जाहिरात , प्रचार व्हावा याकरता विविध राजकीय पक्षांनी उटणे अन पणत्यांचे पाकीट घरपोच घरोघरी पाठवले आहेत. त्यामुळे दिवाळीचे पहिले अभ्यंग स्नानातूनच घरोघरी राजकीय उटण्याचा सुगंध दरवळणार आहे. त्यामुळे नागरिकांना बाज-ारातून उटणे आणि पणत्या खरेदी करण्याची वेळच आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
पनवेल मध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम गणेश-ोत्सव व दीपावली उत्सवा पासूनच वाजू लागले आहेत. गणेशोत्सवामध्येही विविध पक्षांनी जाहिरातींचे बॅनर लावून कळंबोली मध्ये विविध ठिकाणी प्रत्येक शंभर फुटावर हार्दिक शुभेच्छांच्या स्वागत कमानी लावून प्रचाराचा धडाका सर्वच राजकीय पक्षाने उडून दिला होता. आता दीपावलीच्या मंगलमय सणांमध्येही आपल्या पक्षाची अन उमेदवारांच्या प्रचाराची जाहिरात करण्यासाठी आणि पक्ष त्याचे चिन्ह व त्याची माहिती घरपोच होण्यासाठी राजकीय पक्षांनी सुगंधीत उटणे आणि पणत्यांचा आधार घेतला आहे. दिवाळीच्या अगोदरच घरोघरी सुगंधित उटणे आणि दोन पणत्यांचे भरलेले पाकीट व पाकिटावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची छबी असलेले फोटो छापून घरोघरी सदरचे पाकीट वितरित करण्यात आले आहे. नागरिकांच्या घरपोच पणत्या आणि उटणे मिळाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. या राजकीय पक्षांकडून मिळालेल्या पणत्यांमधूनच अंधकारातून तेजोमय प्रकाश हा प्रत्येकाच्या घराघरात पसरणार आहे सुगंधीत उटण्याचा राजकीय प्रचाराचा सुगंध हा अभंग्य स्नानाच्या पहिल्या वहिल्या आंघोळी मधूनच सर्वत्र दरवळणार आहे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी संगीतमय पहाट सुरमय पहाट अशा गाण्यांच्या मैफिली ही आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये संगीत क्षेत्रात नावाजलेल्या दिग्गज कलाकारांनाही आमंत्रित केले आहे. या ठिकाणीही मोठी राजकीय प्रचाराची रणधुमाळी उडवली जाणार आहे. याकरता सुद्धा भला मोठा खर्च सर्वच राजकीय पक्ष करीत असून दिवाळीच्या पहिल्या दिवशी कळंबोलीतील नागरिकांना विविध राजकीय पक्षांकडून सुरमय सुरेल अशी संगीताची मेजवानी ही पहाटे पहाटे मिळणार आहे. या पहाटेच्या संगीतमय मैफिलीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांना विशेष करून एकाच रंगाच्या हजारो साड्यांचे वाटपही काही भावी नगरसेवकांकडून करण्यात आल्याचे समजते.
राजकीय पक्षांसाठी पर्वणीच
सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या मोसमाची चांगलीच सुवर्णसंधी साधली आहे आणि घरोघरी उटणे पणत्या, आकाश कंदील त्याच्यासोबत आपल्या पक्षाच्या जाहिरातीचे पॉम्पलेट प्रसिद्ध पत्रक देऊन महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभकेल्यासारखे आहे. या प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आकाश कंदीलही भले मोठे कळंबोली टांगले आहेत. त्यावर आपल्या नेत्याची भविष्यात नगरसेवकाचे बाशिंग ज्यांनी ज्यांनी बांधले आहे त्यांनी त्यांचा फोटो छापून आकाश कंदील सर्वत्र झळकवले आहेत. या आकाश कंदीलांमधून दिव्यांची ही उधळण करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या मोसमात पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यासारखे दिसून येत आहे .