

पोलादपूर : गेल्या चोवीस तासात पावसाची संततधार गुरुवारी सायंकाळी 6 नंतर काही वेळेकरता शमली असली तरी जून महिन्यात पावसाने तिसऱ्यांदा शतकी नोंद नोंदवली आहे या मुळे आजपर्यत सरासरी 1 हजार च्या पुढे गेल्याची माहिती आपत्ती निवारण पोलादपूर कक्ष मधून देण्यात आली आहे.
गुरूवारी सकाळी 105 मी.मी. पावसाची नोंद तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामध्ये करण्यात आली. गुरूवारी दिवसभर संततधार सुरू राहिल्याने पोलादपूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले. गुरूवारी सायंकाळी 5 वाजता पावसाची एकूण नोंद 1073 मी.मी. झाल्याने यंदा पोलादपूरच्या इतिहासात प्रथमच 19 जूनपर्यंत पावसाची हजारी नोंद झाल्याचे दिसून आले.
पोलादपूर तालुक्यातील सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई या पाच प्रमुख नद्यांसह सर्व नद्याची पात्रं दुथडी भरून वाहू लागल्याचे चित्र दिसून येत होते. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर सातारा जिल्हा हद्दीत दरड आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर पोलादपूर हद्दीत चिरेखिंड च्या अलीकडे तीन ठिकाणी मातीचा ओसरा आल्याने काही तासांकरता वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
सर्वत्र पाऊस जोरदार पडत असल्याने पोलादपूर ते आंबेनळी घाटरस्त्यासह कशेडी घाट मार्गावर शुकशुकाट पहावयास मिळाला. आंबेनली घाटात मातीचा ओसरा आल्याने तातडीने जेसीबी पाठवत माती बाजूला करण्यात आल्याची माहिती पोलादपूर आपत्ती निवारण मार्फत देण्यात आली.