

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
मुद्रा कर्ज वितरणात रायगड जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. मुद्रा कर्ज वितरणात गेल्या वर्षभरात जिल्ह्याचा आलेख कायम चढता राहिला आहे. रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत गेल्या 11 महिन्यांत एकूण 598 कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका लघु व्यावसायिक कर्जांचे प्रमुख माध्यम आहेत. मुद्रा लोनमध्येही त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. एकूण कर्ज वितरणात त्यांचा वाटा 55 टक्क्यांहून अधिक आहे. तर खासगी व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, एमएफआयएस आणि एनबीएफसीएस यांचा उर्वरित हिस्सा आहे. मुद्रा कर्ज योजनेसाठी सरकारी बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकाकडे अर्ज करता येतो. शिशू श्रेणीअंतर्गत 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. किशोर श्रेणीत 50 हजारांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तर तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. मुद्रा योजनेंतर्गत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तिन्ही श्रेणी मिळून एकूण 598 कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये शिशू श्रेणीअंतर्गत 18 हजार 868 जणांना 64.14 कोटी, किशोर श्रेणीत 19 हजार 170 जणांना 278.86 कोटी तर तरुण श्रेणीअंतर्गंत 3 हजार 340 जणांना 255 कोटी असे एकूण 41 हजार 378 जणांना 598.48 कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. हे कर्ज जिल्ह्यातील विविध बँकांमधून वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, रायगड जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया या बँक कर्ज वितरणात अग्रणी ठरल्या आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याने मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच या वर्षी आपल्या जिल्हयाला पुरस्कारही देण्यात आला आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, रायगड जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया या बँक कर्ज वितरणात अग्रणी ठरल्या आहेत. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त चांगली कामगिरी रायगड जिल्ह्याने केली आहे. यापुढेही जास्तीत जास्त युवा उद्योजकांना मदत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल.
विजयकुमार कुलकर्णी, अग्रणी जिल्हा प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, रायगड