

पनवेल : खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.15) आहे. यासाठी नवी मुंबई पोलीस पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. खारघर उपनगरामधील 9 एकर जागेवर इस्कॉन मंदिराची उभारणी झाल्याने उपनगराची खर्या अर्थाने अध्यात्मिक ओळख देशपातळीवर होणार आहे.
बुधवारी होणार्या कार्यक्रमात पंतप्रधानांची सुरक्षा आणि सुमारे पाच हजार भाविकांची सोय ध्यानात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कडे आखले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापासून ते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जाईपर्यंत खारघर येथील टाटा कर्करोग रुग्णालय ते इस्कॉन मंदिर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. खारघरमध्ये सुमारे दोन हजार वाहने दाखल होतील या अंदाजाने पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरते वाहनतळ आणि वाहनतळापर्यंत दिशा दाखविण्यासाठी पाचशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तयार ठेवला असल्याची माहिती नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. याशिवाय नवी मुंबई पोलीसांचा शहर भर आणि कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सोमवारी याच पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनूसार पुढील बदल करण्यात आले आहेत.