

पेण शहर : पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणार्या डोलवी ग्राम पंचायतमधील कामांबाबत नेहमीच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आता तर झालेल्या कामाच्या देखील निविदा काढण्यात येत आहेत. अशा निविदा काढण्यामागचा उद्देश तरी काय असा सवाल रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
डोलवी ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामनिधी अंतर्गत साहित्य पुरवठा व विकासकामे यांच्या जाहीर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गावातील कानिफनाथ समाजमंदिर शेजारील संरक्षक भिंत बांधण्यासाठी देखील 9 लाख 79 हजार 350 रुपयांच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र हे काम यापूर्वीच झाले असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी उघड करून पत्रकार परिषद घेतली.
संजय जांभळे यांनी पत्रकारांशी बोलताना डोलवी ग्राम पंचायत मधील कारभार हा भ्रष्ट झालेला असून यापूर्वी देखील मी असाच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. त्याची प्रक्रिया देखील सुरू असून देखील या सत्ताधार्यांना शहाणपण सुचत नसेल तर त्यांचे दुसरे दुर्भाग्य नाही. नुकतीच डोलवी ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामनिधी अंतर्गत साहित्य पुरवठा व विविध विकासकामे करण्याबाबत ग्राम पंचायतच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सदर निविदा ज्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये निविदा जाहीर करण्याची तारीख 7 जुलै 2025 ते 7 जुलै 2025 अशी असून 18 जुलै रोजी निविदा उघडल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे. मुळात ही तारीखच अजून आली नसून यापूर्वीच हे काम झालेले आहे. तर मग झालेल्या कामाची निविदा काढण्याचा उद्देश तरी काय असा सवाल जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी उपस्थित केला आहे.
आमच्या गावचे हे संरक्षक भिंतीचे केलेले काम तर निकृष्ट दर्जाचे तर आहेच पण केलेल्या कामाची निविदा ही येत्या 18 तारखेला उघडणार आहे ही खर्या अर्थाने शासनाची फसवणूक आहे. याची वरिष्ट स्तरावर चौकशी व्हावी.
गणेश बैकर, स्थानिक ग्रामस्थ
झालेल्या कामाची निविदा काढून जवळपास पावणेदहा लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची आम्ही पोलखोल केली आहे. प्रशासनाने याची तातडीने पाहणी करून कारवाई करावी.
संजय जांभळे, माजी सदस्य, जिल्हा परिषद
या प्रकरणाबाबत ग्रामस्थ सुद्धा भेटायला येणार होते. यात घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल मागविण्यात येईल आणि त्याप्रमाणे चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
गजानन लेंडी, गट विकास अधिकारी, पेण