

कमलेश ठाकूर
पेण : येत्या आठ दिवसात नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. या वेळी नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या 500 मूर्ती व लहान आकाराच्या 2 हजार मूर्ती उत्सवासाठी सज्ज करण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू असल्याचे चित्र पेणमधील कारखान्यांमध्ये दिसून येत आहे.
गणेशोत्सव संपला, नंतर साखर चौथचा गणेशोत्सव संपला आणि लगेच आठवड्यात आश्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापनेला सोमवार 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असल्याने पेणच्या विविध कारखान्यांमध्ये पुन्हा एकदा नवदुर्गेच्या विविध रूपांतील आणि आकारांतील मूर्ती बनविण्याचे व रंगकामाचा अखेरचा हात फिरविण्यात मूर्तीकार मग्न झाले आहेत. एकूणच मूर्ती कलेसाठी पेण तालुका प्रसिद्ध असल्याने हजारो मूर्तिकार लाखो गणेश मूर्ती वर्षभर बनविण्याचे काम करीत असतात. त्यानंतर त्याना पुन्हा दुर्गामातेच्या मूर्ती बनवीत रहावे लागते. (Latest Raigad News)
लगेच पितृपक्ष समाप्तीनंतर अश्विन शुध्द प्रतिपदेला अर्थात घटस्थापनेला प्रारंभ होतो. गणेश उत्सवाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या उत्सव मंडपात दांडिया, गरवाचे विशेष आकर्षण असते, अशी मंडळे, नवदुर्गेची मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाचे आकर्षण वाढवीत असतात. विशेष करून तरूणाई या मंडळाच्या ठिकाणी नऊ दिवस जातीने हजर राहते. मंडळाची मूर्ती जेवढी आकर्षक तेवढाच उत्सवाचे स्वरूप मोठे असते. त्यामुळे नवरात्री उत्सव मंडळाची आवड यावर्षी मोठ्या मूर्तीवर जास्त करून आहे.
साधारणपणे आठ फुट, दहा फुट, बारा फुट उंचीच्या नवदुर्गाच्या वाघावर, सिंहावर, कोंबडयावर, हत्तीवर आणि राजसिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या मूर्ती यासह महिषासुरमर्दिनी, चंडिका, अंबिका, एकविरा, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर गडावरची रेणुका, तुळजापुरची तुळजाभवानी, नाशिकची सप्तशृंगी भवानी, माता सरस्वीत, माता लक्ष्मी या प्रकारातील मूर्ती पेणमधील कार्यशाळांमध्ये रंगसंगतीने नटल्या आहेत. या शिवाय याच प्रकारातील एक फुटापासून तीन फुटापर्यंत उंचीची नवदुर्गेच्या मूर्तीसुध्दा मागणीनुसार बनविलेल्या आहेत. यावर्षी कार्यशाळांमध्ये मूर्तींची मागणी वाढत आहे.
पेणमधील सर्वच मूर्ती कला केंद्रांत आता फक्त दुर्गामाता मूर्ती बनविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत शेकडो दुर्गा मूर्ती या रायगडसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत रंगवून पाठविल्या असल्याचे पेणमधील मूर्तीकारांनी सांगितले आहे. आता शेवटच्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील आणि पेण तालुक्यातील मूर्ती बनविण्याचे काम सुरु आहे, असे पेण तरणखोप येथील विघ्नहर्ता कला केंद्राचे मूर्तिकार स्वप्नील पाटील यांनी बोलताना सांगितले.