

जयंत धुळप
रायगड : रायगड जिल्ह्यातील पेणच्या गणेशमूर्तींची ओळख केवळ तिचे सुबक रूप नाही, तर ते आहेत तिचे ‘जिवंत’ डोळे. जणू काही मूर्तीतून साक्षात बाप्पा आपल्याकडे पाहत आहेत, असा भास व्हावा... हे केवळ एक वैशिष्ट्य नसून, पिढ्यान्पिढ्या जपलेल्या एका दैवी कलेचा वारसा आहे. या ‘बोलक्या’ डोळ्यांमागे दडली आहे, मूर्तिकारांची एक खास ‘पंचसूत्री’, जी पेणच्या गणेशमूर्तीला जगभरात ओळख मिळवून देते. पेणच्या मूर्तिकारांची अनेक घराणी पिढ्यान्पिढ्या ही कला जपत आली आहेत. मूर्तीचे डोळे हे केवळ रंगांचे फटकारे नसून, त्यात भाव, भक्ती आणि जिवंतपणा ओतण्याचे एक शास्त्र आहे. या शास्त्राचा पायाच या पंचसूत्रीवर आधारलेला आहे.
1. जिवंतपणा (रियालिस्टिक एक्सप्रेशन) : पेणच्या मूर्तींच्या डोळ्यांतून कृपा, प्रेम आणि वात्सल्य असे भाव थेट भक्तांपर्यंत पोहोचतात. जणू काही गणपती स्वतः आपल्याकडे पाहत आहेत, अशी जाणीव करून देणारा जिवंतपणा, हे या कलेचे सर्वोच्च वैशिष्ट्य आहे.
2. मोठे आणि स्पष्ट डोळे (लार्ज क्लिअर आईज) : गणेश मूर्तीचे डोळे मोठे, गोलसर आणि स्पष्ट रेषांनी आखलेले असतात. त्यामुळे ते दूरूनही लक्ष वेधून घेतात आणि मूर्तीच्या चेहर्यावर एक सात्त्विक तेज निर्माण करतात.
3. सखोल रेखाटन (डीप लायनिंग) : डोळ्यांभोवती काजळाप्रमाणे गडद आणि सखोल रेषांनी केलेली आखणी डोळ्यांना अधिक खोली आणि प्रभावीपणा देते. भुवयांची आणि पापण्यांची नेमकी रचना या सौंदर्यात भर घालते.
4. भावनात्मक अभिव्यक्ती (इमोशनल डेप्थ) : प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यांत एक वेगळा भाव दडलेला असतो. कधी त्यात करुणा दिसते, कधी धीटपणा, तर कधी वात्सल्याचा सागर दिसतो. हा भाव साकारणे हे पूर्णपणे मूर्तिकाराच्या कौशल्यावर आणि त्याच्या भक्तिभावावर अवलंबून असते.
5. हाताने रंगवलेले डोळे (हँड पेंटेड आईज) : हे या पंचसूत्रीचे सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे. पेणचे मूळ मूर्तिकार डोळे हातानेच रंगवतात. त्यामुळे प्रत्येक मूर्तीचे डोळे खास आणि एकमेवाद्वितीय असतात. यात मशिनने तयार केलेल्या मूर्तींचा कृत्रिमपणा नसतो, ज्यामुळे मूर्ती अधिक सजीव वाटते.