

रोहे : उन्हाळी हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते सुभेदारगंज दरम्यान ३ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचा लाभ रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.
मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०४१०४ पनवेल-सुभेदारगंज साप्ताहिक विशेष ही गाडी गुरुवार, दि. २१ मे २०२६ आणि दि. २८ मे २०२६ रोजी पनवेल येथून दुपारी ३:२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:०० वाजता सुभेदारगंज येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०४१०३ सुभेदारगंज-पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी बुधवार, दि. २७ मे २०२६ रोजी सुभेदारगंज येथून दुपारी २:४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २:२० वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. या विशेष गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर जंक्शन येथे थांबे देण्यात आले आहेत.
गाडीची संरचना पुढीलप्रमाणे असणार आहे :
१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा
६ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे
८ शयनयान डबे
५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
१ सामानासह गार्ड्स ब्रेक व्हॅन
१ जनरेटर व्हॅन
विशेष गाडी क्रमांक ०४१०४ साठी विशेष शुल्कासह आरक्षणाची सुविधा सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांना RailOne ॲपद्वारेही तिकीट आरक्षित करता येणार आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा NTES ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.