Maharashtra Railway Development
रायगड : मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे चाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल.
महाराष्ट्रातील राहुरी शनिशिं गणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली. त्यामुळे शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळी जाणाऱ्या प्रवाशांसाठी या रेल्वे मार्गिकिचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. तर, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान पनवेल कॉर्ड लाइन्स (रेल्वे मार्गावर)एका मुख्य मार्गाला जोडलेली दुसरी छोटी रेल्वे मार्गिका) बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे मालवाहतूक सुरळीत, जलदगतीने होण्यास मदत होईल.
अहिल्यानगरपासून ३० किमी अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शनिशिंगणापूर येथे सध्या थेट रेल्वेने जाता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना शनिशिंगणापूर वेळेत आणि वेगात पोहोचता येत नाही. शनिशिंगणापूर येथे यात्रेकरू, पर्यटक आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राहुरी शनि शिंगणापूरदरम्यान २१.४८ किमी लांबीची नवीन रेल्वे मार्गिका तयार करण्यात येणार आहे.
या मार्गासाठी ४९४.१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहू-केतू मंदिर आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) या धार्मिक आणि पर्यटनस्थळांनाही फायदा होईल. या नवीन मार्गात दररोज आठ फेऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या धावतील, असा प्रस्ताव आहे. त्यामुळे वार्षिक प्रवासी संख्या अंदाजे १८ लाख असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल चिखलीदरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल.
पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पक्षिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सने वाहतुकीसाठी विलंब होतो. यावर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाइन्स प्रस्तावित केल्या होत्या. आता त्यांना मान्यता दिली आहे.
या नवीन रेल्वेच्या जाळ्यामुळे रेल्वेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि गर्दी कमी होईल. ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची वाहतूक सुरळीत आणि जलद होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.