

पनवेल : विशेष मतदार पुनरिक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआरच्या कामाला पनवेल तालुक्यात वेग आला असतानाच आता बीएलओ (बूथ लेव्हल ऑफसिर) यांचे मोबाईल लॉक होण्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. एकीकडे ८० हून अधिक मतदारांना नोटिसा बजावून त्यांच्या सुनावण्या घेण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे संबंधित बीएलओचे मोबाईल लॉक होत असल्याने एसआयआरचे ऑनलाइन कामकाज ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मतदार यादीतील नावाबाबत आक्षेप, नावामध्ये बदल, पत्त्यामध्ये चुकीची नोंद किंवा अन्य त्रुटी असलेल्या मतदारांची नव्याने सुनावणी आजपासून पनवेल तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. या सुनावणीसाठी संबंधित मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, कागदपत्रांची पडताळणी व आवश्यक माहिती घेण्याचे काम बीएलओ स्तरावर केले जात आहे.
मात्र, मोठ्या प्रमाणात नोटिसा बजावल्यानंतर काही बीएलओचे मोबाईल अचानक लॉक होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. एसआयआरच्या कामासाठी मोबाईलवर आवश्यक असलेल्या प्रणालीचा वापर केला जात असल्याने मोबाईलच लॉक झाल्यास मतदारांची माहिती अद्ययावत करणे, कागदपत्रांची नोंद करणे आणि सुनावणीसंदर्भातील ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे अडचणीचे ठरत आहे.
बीएलओचे मोबाईल ब्लॉक होत असल्याने आता आम्ही काय करायचे?' असा सवाल संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात असून, तांत्रिक अडचण तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे. एसआयआरच्या सुनावण्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मतदार यादीत नाव नसणे, नावात बदल होणे, पत्ता चुकीचा असणे अथवा अन्य नोंदींबाबत आक्षेप असलेल्या मतदारांची सुनावणी सुरू झाली आहे. संबंधित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे व माहिती घेऊन पडताळणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनावणीचा टप्पा महत्त्वाचा आहे.
तालुक्यातील विविध स्तरावर सुनावणी प्रक्रिया सुरू आहेत, दिवसाला ३०० हून अधिक सुनवण्या पूर्ण करण्याच्या सूचना बी एल ओ यांना देण्यात आल्या आहेत, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे अडथळे येऊ लागले आहे तसेच एका सुनावणीला पंधरा ते वीस मिनिटे जात असल्याने सुनवण्या कशा पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.