

पनवेल ः रविवारी पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला. पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. मुसळधार पावसामुळे काहींनी घरात बसणे पसंत केले.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पडघे गावात एक रिक्षा पावसाच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने या रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवार 7 जुलै रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पडघे गावातील छोट्याशा ब्रिजवर उभी ठेवण्यात आलेली रिक्षा या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली. मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील मोरबे गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मोरबे गावाजवळ काही किलोमीटर अंतरावर धरण आहे या धरणातील पाणी जास्त प्रमाणात बाहेर आल्याने आणि मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. काही वाहने देखील या पाण्यात अडकली.
हरिग्राम गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. केवाळे मध्ये नवीन बांधकाम सुरू असल्याने त्याचा फटका हरिग्राम गावाला बसत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. सतत पडणार्या पावसामुळे गाढी नदीला अचानक पाणी आले. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रविवार असल्याने बहुतांशी कामगारांना सुट्टी असल्याने त्यांनी घरी राहून या पावसाचा आनंद लुटला. दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने नद्यांचे देखील पाणी कमी झाले. तसेच रस्त्यांवर आलेले पाणी निघून गेले. चिपळे येथील धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. या पुलाच्या खाली पावसाचे पाणी लागले.
आदई गाव पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसात पाण्याखाली गेलेले आहे. आदई गावात अनेक इमारतींची कामे सुरु आहेत. इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे नागरिक बोलत आहेत. रविवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. अनेक ठिकानी पाणी साचलेले आहे. आदई येथील काही ठिकाणच्या रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात हि अवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकंदरीत हा पावसाळा आदईकरांसाठी आव्हानात्मक असणार हे निश्चित आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. येथील वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.