Panvel Platform changes : पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म रचनेत बदल; प्रवाशांची पायपीट वाढली

प्रवाशांमध्ये संभ्रम आणि धावपळीचे वातावरण
Panvel Platform changes
पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म रचनेत बदल; प्रवाशांची पायपीट वाढली pudhari photo
Published on
Updated on

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकावरून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पनवेल स्थानकावरील प्लॅटफॉर्मची रचना आणि लोकल गाड्या थांबण्याच्या ठिकाणात मोठे बदल करण्यात आल्याने आता प्रवाशांना ट्रेनपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक अंतर चालावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे तसेच रेल्वेच्या तांत्रिक बदलांमुळे लोकल आणि काही मेल-एक्सप्रेस गाड्या आता प्लॅटफॉर्मच्या पुढील भागात थांबत आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मच्या प्रवेशद्वारापासून डब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त पायपीट करावी लागत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला याचा अधिक त्रास सहन करावा लागू शकतो.

सोमवारपासून नव्या आठवड्याची सुरुवात होत असल्याने स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली वेळेची गणिते बदलून किमान 15 मिनिटे आधी घरातून निघावे, असा सल्ला रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरही “पनवेल स्टेशनवर ट्रेन आता पुढे थांबते, अतिरिक्त चालण्यासाठी तयार राहा,” अशा सूचना मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. काही प्रवाशांनी या बदलामुळे ट्रेन पकडताना धावपळ वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पनवेलकरांनी आता या नव्या बदलाची सवय करून घेत वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा काही मिनिटांच्या उशिरामुळे लोकल चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news