

Panvel Police Stolen Goods Recovered
पनवेल : चोरीच्या विविध गुन्ह्यांचा छडा लावत पनवेल परिमंडळातील पोलिसांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांनी ४८ गुन्ह्यांची उकल करून तब्बल १ कोटी २२ लाख ९४ हजार २६७ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. यामध्ये १४० मोबाईल फोन, १२९ ग्रॅम सोने, ४७ तोळे चांदी, आठ वाहने आणि १७ लाख ३४ हजार ७०० रुपयांच्या रोख रकमेसह अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, खारघर आणि तळोजा या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे विविध गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांतील चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून तो संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. तपासादरम्यान मिळालेल्या यशामुळे अनेक नागरिकांना आपला मौल्यवान मुद्देमाल पुन्हा मिळवता आला.
या कारवाईत मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, वाहने, रोख रक्कम आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला. अनेक दिवसांपासून हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३, पनवेल तसेच पनवेल आणि खारघर विभागांच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासामुळे चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.
गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यासोबतच चोरीस गेलेली मालमत्ता पुन्हा मिळवून देण्यावरही पनवेल परिमंडळातील पोलिसांनी भर दिला आहे. तब्बल १.२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्याच्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासकामगिरीला बळ मिळाले असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढविण्यासही मदत होणार आहे.