

पनवेल : न्यायाधीश , अधीक्षक आणि सहाय्यक अधीक्षक यांच्या खोट्या सह्या मारून बोगस वारस दाखले बनवल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पनवेल न्यायालयाचा कारकून दीपक फड प्रकरणाला आत्ता वेगळे वळण लागले आहे. दीपक फड याने वारस दाखल्यासाठी आवश्यक असलेले कोर्ट फीची चलन पावत्या बोगस बनवून त्याचे वितरण केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दीपक फडने जवळपास 78 बोगस चलन पावत्या बनवल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहरात चर्चेत असलेल्या बोगस दाखला प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागू लागले आहे. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी पनवेल परिसरातील वकील योगेश केळकर आणि वकील अमर पटवर्धन यांना अटक केली होती. त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी दीपक फडकडून अधिकचा तपास सुरू ठेवला आहे. या तपासात पोलिसांना दरवेळी वेगळी वेगळी माहिती मिळून येत आहे. दीपक फड याने एक बोगस दाखला बनवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. पण या सोबत त्यांनी अन्य देखील बोगस दाखले बनवले असतील अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र दीपक फड याने या बोगस दाखल्यासाठी आवश्यक असलेली कोर्ट फीच्या खोट्या बोगस चलन पावत्या बनवल्याचे तपासात पुढे आले आहे. जवळपास 78 बोगस चलन पावत्या बनल्याचे सागितले जात आहे.
विशेष म्हणजे ही बोगस चलने अशिलाला वितरीत केल्या असाव्यात, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दीपक फड प्रकरणात पुढे काय होणार याची चर्चा पनवेल शहरात रंगू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा हात आहे, याचा तपासही पोलिसांनी सुरु केलेला आहे. एकूणच या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.