

पनवेल : विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 18 जुलै रोजी अभय योजना जाहिर केली असून गेल्या आठ दिवसात 29 कोटीं 56 लाखाची वसुली केली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने नियोजनबध्द पध्दतीने नियोजन करुन मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सुरु आहे. दररोज सुमारे 4 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.
दरम्यान चारही प्रभागामध्ये तसेच पालिका मुख्यालयात नागरिकांच्या मालमत्ताकराविषयीच्या सर्व तक्रारी सोडविण्यावर भर दिला जात आहे. तसेच नागरिकांच्या मालमत्ताकर बिलामधील दुरूस्ती मालमत्ता कर विभाग तत्काळ करून देत आहेत. यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार देखील महापालिकेची कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या बिलाबाबतच्या शंकेचे निरसन करून आपला मालमत्ता कर भरून पनवेलच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनूसार मालमत्ताकरांवरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचे चार महत्वाचे टप्पे आहेत. यामध्ये प्रामुख्याने 18 जुलै ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 90 टक्के सूट मिळणार आहे. तसेच 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालाधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 75 टक्के सूट मिळणार. तसेच या पुढील काळात म्हणजे 1 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर कालावधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे. 11 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालाधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास असलेल्या शास्तीमध्ये 25 टक्के सूट मिळणार आहे. ही अभय योजना केवळ एकवेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईट, टॅक्स अॅप अथवा पनवेल कनेक्ट अॅपद्वारे नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास त्यांना 2 टक्के सवलत मिळेल तसेच चालू वर्षाचा म्हणजे 2025-26 चा कर 31 जुलैपर्यंत भरल्यास त्यांना या करामध्ये 5 टक्के सूट मिळेल, तरी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.
महापालिकेची अभय योजना आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरू असून यासाठी महापालिकेने नवीन मालमत्ता कर संकलन केंद्रे सुरू केली आहेत. त्यामध्ये 1.मालमत्ता कर संकलन केंद्र - प्राईड सोसायटी सेक्टर 7, खारघर,2.महा ई सेवा केंद्र - गंगा टॉवर, सेक्ट र 21 कामोठे,3.महा ई सेवा केंद्र - ऍलियश बिल्डींग से17 प्लॉट नं84 मोठा खांदा नवीन पनवेल, 4.सर्व 5 प्रभाग कार्यालये (नावडे उपविभागासहित) आणि 5.मुख्यालय पनवेल या केंद्रांचा समावेश आहे.अभय योजनांचा लाभ संबधित नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.